|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मांडवी, झुआरीत वाजपेयींच्या अस्थिकलशांचे विसर्जन

मांडवी, झुआरीत वाजपेयींच्या अस्थिकलशांचे विसर्जन 

प्रतिनिधी/ पणजी, झुआरीनगर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उत्तर गोवा जिल्हय़ातून फिरवण्यात आलेल्या अस्थिकलशाचे विसर्जन पणजी येथील फेरीधक्याजवळ मांडवी नदीत करण्यात आले. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, इतर पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दक्षिण गोव्यात कुठ्ठाळीतील फेरी धक्याजवळ झुआरी नदीत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते कलशाचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जनासाठी ‘विहान प्रुझ’ या बोटीची व्यवस्था करण्यात आली होती. गुरूवार, शुक्रवार 23 व 24 ऑगस्ट असे दोन दिवस उत्तर गोव्यातील प्रमुख शहारातून तसेच प्रमुख गावातून हा अस्थिकलश जनतेच्या दर्शनासाठी फिरवण्यात आला. त्यावेळी अनेक लोकांनी दर्शन घेतले.

सायंकाळी पणजीत पोहोचली यात्रा

एका विशेष रथातून हा अस्थिकलश उत्तर गोव्यात ठिकठिकाणी दर्शनासाठी नेण्यात आला. त्यावेळी वाजपेयींच्या भषणाची धून वाजवण्यात येत होती. भाजप कार्यकर्ते, हितचिंतक, वाजपेयीप्रेमी जनतेने अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहील. संध्याकाळी 5.30 वा. च्या सुमारास हा अस्थिकशल पणजीत आणण्यात आला. जेटीवर तो दर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आला. त्यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत, आमदार ग्लेन टिकलो, आमदार प्रवीण झांटये, आमदार राजेश पाटणेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद मांद्रेकर, सदानंद तानावडे, कुंदा चोडणकर, शीतल नाईक, वैदेही नाईक, विश्वास सतरकर व इतरांची अस्थी विसर्जनास उपस्थिती होती. अस्थी कलश घेऊन येणारे वाहन कोंडीत अडकू नये म्हणून वाहतूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कुठ्ठाळी येथे झुआरी नदीत विसर्जन

दक्षिण गोव्यात फिरविण्यात आलेल्या अस्थिकलशाचे कुठ्ठाळी  दाबोळी, वास्को व मुरगाव मतदारसंघात नागरिकांनी दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास कुठ्ठाळीतील फेरी धक्याजवळ झुआरी नदीत या अस्थींचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. खासदार नरेंद्र सावईकर, आमदार एलिना साल्ढाणा, आमदार नीलेश काब्राल, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार विजय पै खोत, दामू नाईक तसेच असंख्य कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

काल शुक्रवारी सकाळपासून वाजपेयींचा अस्थिकलश सुशोभीत रथावरून कुठ्टाळी, दाबोळी, वास्को व मुरगाव मतदारसंघात फिरण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनीही ठिकठिकाणी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन वाजपेयींना आदरांजली वाहिली. दुपारी एकच्या सुमारास कलशाचे झुआरीनगरात आगमन झाले. काही वेळ हा अस्थिकलश या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर दाबोळी भागातही अस्थी कलशाचे दर्शन देण्यात आले. सायंकाळी चारच्या सुमारास वास्को शहरातील पालिका इमारतीसमोर कलश ठेवण्यात आला. या ठिकाणीही मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी दर्शन घेऊन वाजपेयींना आदरांजली वाहिली. त्यानंतर मुरगाव मतदारसंघात ही यात्रा निघाली. ठिकाणी नागरिकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. आमदार मिलिंद नाईक, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर  व पक्षाचे इतर नेतेही या कलश यात्रेसोबत होते. नगरसेवक, समाजसेवक यांचाही यावेळी सहभाग होता.

सायंकाळी 5.25 वा. झुआरी नदीत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्वानंद भगत, ज्योएल फर्नांडिस, सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले, उपसरपंच कविता कमल, पंच सदस्य नारायण नाईक, सतीश पडवळकर, रंगाप्पा कमल, अच्युत नाईक, समीर भगत, सारा गोन्साल्वीस, अरूण नाईक, अनिता रायकर, अरूण गावस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन पुष्पांजली वाहीली. या अस्थिकलशाचे शालेय विद्यार्थ्यांनीही दर्शन घेतले.