|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बिबटय़ा कातडी तस्करीप्रकरणी आठजणांच्या टोळीला जामीन

बिबटय़ा कातडी तस्करीप्रकरणी आठजणांच्या टोळीला जामीन 

कणकवली:

बिबटय़ाचे कातडे विक्रीच्या उद्देशाने नेत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचून ताब्यात घेतलेल्या आठजणांच्या टोळीला आठवडाभराच्या पोलीस कोठडीनंतर जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या घटनेतील अनेक प्रश्न अनुत्तरीतच असल्याने पोलीस कोठडीच्या कालावधीत पोलिसांनी नेमका काय तपास केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत विचारणा केली असता, संशयितांना जामीन मिळाला असला तरी अद्याप तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ही कारवाई 13 ऑगस्टच्या रात्री हुंबरट तिठा येथे करण्यात आली होती. 13 लाखांचे बिबटय़ा व वन्य प्राण्यांचे कातडे आणि 11 नखे, गुन्हय़ातील टाटा सुमो व संशयितांचे मोबाईल मिळून 17 लाख 62 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. तर आठही संशयितांविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुढील दिवसांत संशयितांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. यावेळी घटनेचा कसून तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

संशयितांनी हे कातडे कोठून व कधी मिळविले? बिबटय़ाच्या शिकारीत संशयितांचा व्यक्तिश: सहभाग आहे का? शिकार कोठे करण्यात आली? संशयित हे कातडे कोणाला देण्यासाठी कणकवलीच्या दिशेने येत होते? संशयित ज्याच्याकडे कातडे देणार होते, तो नेमका त्यांना कोठे भेटणार होता? संशयितांनी यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का? या घटनेत आणखी कोणाचा व कशाप्रकारे सहभाग आहे? यासारखे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत.

कोठडीच्या कालावधीत या घटनेत आणखी एकाचा सहभाग असून हा संशयित मूळ कणकवलीचा असून सध्या त्याचे मुंबई परिसरात वास्तव्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. मग या संशयिताबाबत काय कार्यवाही झाली? संशयितांच्या कॉल रेकॉर्डमधून काय सुगावा लागला, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.