|Sunday, July 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अंतराळ यात्रा

अंतराळ यात्रा 

आटपाट नगरातली जनता आणि नेते भारतातील प्रकल्पांची नक्कल करायला कायम टपलेले असतात. आपल्या पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले की येत्या काही वर्षात प्रत्येक भारतीयाला अंतराळात प्रवास करण्याचे भाग्य लाभेल. ही बातमी वाचून आटपाट नगरातील नेत्यांनी भारताच्या पुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. ‘राहू एक पाऊल पुढे’ अशी योजनाच त्यांनी जाहीर केली. सरकारच्या खजिन्यात विविध विकास योजनांसाठी राखून ठेवलेला सर्व निधी अंतराळ प्रवासासाठी वापरला. एका वेळी एक ते तीन प्रवाशांना अंतराळ प्रवास परवडावा या हेतूने त्यांनी देशातल्या सर्व रिक्षांना खालच्या बाजूला गॅसवर चालणारी रॉकेट्स बसवली. रिक्षा चालकांनाच आरटीओच्या माध्यमातून ही अंतराळ याने चालवण्याची परमिट्स वाटली. त्यावेळी आटपाट नगरातल्या खळ्ळखटय़ाक संघटनांनी ही परमिट्स परप्रांतियांना देऊ नयेत म्हणून आंदोलने केली. संघटनेतील जे नेते बिल्डर होते त्यांनी आपल्या उंच इमारतींच्या गच्चीवरून अंतराळात चाललेल्या रिक्षांवर गोफणीच्या सहाय्याने दगडफेक केली. पण सरकार आपल्या धोरणांवर ठाम राहिले.

भारतातील रिक्षाचालक अत्यंत प्रामाणिक, पापभीरू वगैरे आहेत. प्रवाशांना ते कधी नकार देत नाहीत, लुटत नाहीत, सतत नम्रपणे वागतात, सुट्टे पैसे प्रामाणिकपणे परत देतात. मात्र आटपाट नगरातील रिक्षाचालक भारतातल्या रिक्षाचालकांप्रमाणे प्रामाणिक आणि पापभीरू नसल्याने त्यांनी या योजनेत प्रवाशांना भरपूर लुटले. पृथ्वीवरून चंद्र किंवा जवळच्या ग्रहावर जायचे असेल तर ते प्रवाशांना नकार देतात. आकाशातून रिकाम्या उडत जाणाऱया रिक्षांना प्रवाशांनी गच्चीवरून हात केला तरी थांबत नाहीत.

 बुध ग्रहावर जायचे असले तर म्हणतात, “मी प्लेटोकडे चाललोय.’’ एका नवख्या प्रवाशाने चंद्रावर जाण्यासाठी रिक्षा केली तर त्याला रिक्षाचालकाने थाप मारली की “या साईडला अंतराळात नो एंट्री आहे,’’ आणि अख्ख्या सूर्यमालेला वळसा देऊन लांबच्या रस्त्याने चंद्रावर नेऊन सोडले आणि त्याच्याकडून भरपूर पैसे उकळले. चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱया अंधाऱया भागात जायचे असेल तर रिक्षाचालक प्रवाशांकडून हाफ रिटर्न भाडे मागतात. काही रिक्षाचालक तर मीटरला फडके बांधतात आणि तोंडाला येईल ती रक्कम मागतात. अंतराळात सरकारने रिक्षाचालकांना भूस्थिर स्थानके बांधून दिली आहेत. पण रिक्षाचालक तिथे न थांबता आकाशात कुठेही तरंगत असतात.

आटपाट नगरातील या बेशिस्तीला काय म्हणावे?