|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संरक्षण सज्जता

संरक्षण सज्जता 

देश बलवान बनवायचा असेल तर देशातले नागरिक बलवान असायला हवेत हे जितके खरे तितकेच देशाची संरक्षण सिद्धता आणि सुसज्जता महत्त्वाची असते. भारतीय सैन्य दल हे अनेक अर्थांनी जगातले अव्वल सैन्यदल बनले आहे. संख्या, सज्जता, आधुनिकता, सराव, कौशल्य समर्पणवृत्ती अशा अनेक कसोटय़ांवर भारतीय सैनिक अव्वल आहेत. पोखरणच्या अणुचाचण्या असोत, केरळची पूरस्थिती असो, तटरक्षणाचे काम असो अथवा सर्जिकल स्ट्राईक, भारतीय सैन्य आणि सैनिक नेहमीच अव्वल ठरला आहे म्हणूनच जगाच्या कानाकोपऱयात भारतीय सैन्य दलाचा बोलबाला आहे. भारतीय सैनिकांचे, सैन्यदलाचे आणि संरक्षण सिद्धतेचे कौतुक आहे. भारतीय सैन्यदलाच्या सज्जतेत नव्याने अनेक पूर्तता होत आहेत. ओघानेच संरक्षण सज्जतेत भारताने भरारी घेतली आहे. नौदलासाठी 46 हजार कोटींच्या 111 हेलिकॉप्टरची नव्याने खरेदी होणार आहे. भारताची ही संरक्षण सिद्धता देशवासियांना आणि जगभरातील शांतताप्रिय नागरिकांना आनंद देणारी आहे. भारत देश सामर्थ्यवान व्हावा अशी सर्वाचीच इच्छा आहे आणि तो होत असताना दहशतवाद, आतंकवाद, घुसखोरी, कुरापती यांना प्रोत्साहन देणाऱया आणि युद्धे, स्फोट, अपहरण, कत्तली, दंगे घडवणाऱया शक्तीला धडकी भरते आहे. भारताला शेजारी चीन आणि पाकिस्तान यांची सततची रखरख असते. घुसखोर, हल्ले, चकमकी, युद्धे यामुळे या शेजाऱयांचा अनुभव चांगला नाही. कुत्र्याचे शेपूट वाकडे तसे पाकिस्तानचे शेपूट वाकडे. पाकिस्तानात नुकतेच सत्ता परिवर्तन झाले आहे. तेथे सत्ता परिवर्तन आणि लोकशाही वगैरे किती जुजबी आहे यांचे अनेकदा दर्शन झाले आहे. पाकिस्तानला एकेकाळी क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकून देणारा इम्रान तेथे पंतप्रधान झाला आहे. पाकिस्तानचे सरकार हे लष्कराच्या आणि आयएसआयच्या निर्देशावर चालते हे अनेकवेळा दिसून आले आहे. इम्रान यांनी जे मंत्रिमंडळ नियुक्त केले आहे त्यातील निम्मे मंत्री हे भारत द्वेषाने पछाडलेले आहेत. पाकिस्तानने मुशर्रफ यांच्या काळात कारगिलवर हल्ला केला होता. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री नव्या इम्रान सरकारमध्ये आहेत आणि सरकार सत्तारुढ होताच त्यांनी भारतद्वेषाचा शिमगा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्कराची सिद्धता, सज्जता महत्त्वाची आहे. अर्थात पाकिस्तानचे नामोनिशाण काही तासात संपण्याची कुमक आणि शक्ती भारतीय सैन्यदलाकडे आहे, पण भारताची जगा आणि जगू द्या ही नीती आणि विश्वकल्याण, मानवकल्याणाची आस मोठी आहे. अटलजी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ‘बुद्ध हसला होता’ भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली. भारताची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली पण, अटलजी काही बोलले नाहीत त्यांनी पाठोपाठ दुसरी अणुचाचणी केली आणि बंदी घालणाऱया सर्वांना उत्तर मिळाले. त्यानंतर अंतरिक्ष तंत्रज्ञान असो, कौशल्य विकास असो, विज्ञान असो भारताने मागे बघितले नाही. तत्त्वज्ञान किंवा सद्विचार संरक्षण करू शकत नाहीत. दुर्बलाला कुणीही किंमत देत नाही. देश सामर्थ्यवान असेल तरच दुनियेत या देशाला किंमत आहे हे ओळखून हिंदुस्थानने पावले टाकली आणि आज ती यशस्वी होताना दिसत आहेत. भारत कुणाचेही वाईट, वाकडे करणार नाही पण, कुणाला वाकडय़ा नजरेने बघूही देणार नाही याची खात्री सर्वांनाच पटली आहे. स्वा. वि. दा. सावरकर यांचे हे स्वप्न होते. त्यांनी जो राष्ट्रवाद मांडला त्यात संरक्षण सिद्धता आणि सज्जता महत्त्वाची होती. 1962 च्या युद्धात ती नसल्याने आपणास मार खावा लागला. पण या धडय़ातून भारतीय सैन्य आणि नेतृत्व बरेच शिकले आणि आम्ही आज सामर्थ्यवान बनलो आहोत. तंत्रज्ञान, सिद्धता आणि आव्हाने रोज नव्याने तपासून बघावी लागतात. त्यात बदल करावे लागतात आणि भरही घालावी लागते. मोदी सरकारने मग संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर असोत निर्मला सीतारामन असोत त्यांनी सैन्यदालचे मनोधैर्य व सामर्थ्य वाढवले आहे. शनिवारी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाशी संबंधित उच्चस्तरीय बैठक झाली त्यामध्ये नौदलासाठी 111 बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी 21 हजार कोटीचा निधी देण्यात आला. संरक्षण सिद्धतेसाठी, अन्य शस्त्रs आणि यंत्रसामुग्रीसाठी 25 हजार कोटी देण्याचे निश्चित करण्यात आले. सुमारे 46 हजार कोटीच्या या निधीमुळे भारतीय नौदल, वायुदल आणि लष्करांच्या सामर्थ्यांत मोठी भर पडणार आहे. या समितीने स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टीमसाठी 3,364 कोटी दिले आहेत. भारतीय सैन्य सामर्थ्य संपन्न बनले आहे. केवळ पैसे आणि शस्त्रs यामुळे युद्ध जिंकता येत नाही. त्यासाठी प्रशिक्षित चांगले सैनिक आणि समर्पित नेतृत्व असावे लागते. भारत या दोन्हीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. आमच्या देशात कितीही धर्म, जाती, भाषा, प्रांत, पक्ष असले तरी आमच्या सर्वांची माता भारतमाता आहे आणि जेव्हा देशांचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सारे एकत्र येतो आणि भारतमातेसाठी समर्पित भावनेने काम करतो. असे अनेकवेळा दिसून आले आहे. पंतप्रधान मोदी दिवाळीचा सण सीमेवर सैनिकांसोबत साजरा करतात. संरक्षणमंत्री सैनिकासोबत असतात. परवा नगरमध्ये लष्कराने एक छोटे प्रदर्शन आणि कवायत करून दाखवली. प्रजासत्ताकदिनी लष्कर आपले सामर्थ्य दाखवत असते ही सिद्धता देशाला निश्चितच भूषणावह आहे. नव्याने त्यात पडलेली भर सैनिकांचे मनोबल व सामर्थ्य वाढवणारी आहे. या सज्जतेने देशाचे आणि सैन्यदलाचे बल वाढलेच. संरक्षण आधी की विकास आधी असा प्रश्न एकेकाळी आपणास पडत होता. पण आज विकास आणि संरक्षण दोन्ही आघाडय़ावर जोरदार काम सुरू आहे. दोन्ही पातळय़ावर निर्धाराने पावले पडत आहेत.