|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मासेमारी करण्यास पर्ससीनधारकांचा मज्जाव

मासेमारी करण्यास पर्ससीनधारकांचा मज्जाव 

पारंपरिक मच्छीमारांचे तहसीलदारांना निवेदन : वेंगुर्ले बंदर, नवाबाग येथे केला मज्जाव

आठ दिवसात कारवाई करा!

अन्यथा कुटुंबियांसमवेत उपोषण!

पारंपरिक मच्छीमारांच्या नौका अडकल्या!

वार्ताहर / वेंगुर्ले:

उभादांडा मूठ कुर्लेवाडी भागातील पारंपरिक मच्छीमारांना वेंगुर्ले बंदर व नवाबाग किनाऱयावरून मासेमारी करण्यास नवाबाग येथील पर्ससीनधारकांनी मज्जाव केला आहे. आम्ही पर्ससीन मासेमारी करताना तुम्ही आमच्या तक्रारी केल्या, तर तुम्हाला आमच्या बंदरातून मासेमारी करता येणार नाही, अशी धमकी पर्ससीनधारकांनी पारंपरिक मच्छीमारांना दिली आहे. याप्रकारामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या नौका नवाबाग येथे अडकून पडल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी उभादांडा येथील पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

यावेळी महादेव मोठे, कमलाकांत गिरप, हेमंत गिरप, तुकाराम आरावंदेकर, विनोद देवजी, राजन गिरप, भाग्यवान गिरप, राजन तोरस्कर, गजानन कुबल, सुशांत तोरस्कर, महेश कुबल, सहदेव गिरप, युवराज गिरप, सुभाष गिरप आदी उपस्थित होते.

तहसीलदारांच्या निर्णयाची पायमल्ली!

उभादांडा मूठ-कुर्लेवाडी येथील मच्छीमार वादळ सदृश परिस्थितीमुळे मासेमारीसाठी वेंगुर्ले बंदर व नवाबाग किनाऱयाचा आसरा घेत मासेमारी करीत आहेत. वेंगुर्ले बंदर व नवाबाग येथे मासेमारीसाठी नौका आल्या असता पर्ससीनधारकांनी उभादांडा मूठ-कुर्लेवाडी येथील नौकांच्या मालकांना बोलावून घेत त्यांना या परिसरात मासेमारी करण्यास मज्जाव केला. आपत्तीजनक परिस्थितीत कोणत्याही मच्छीमारी नौकांना कोणत्याही बंदरात जाता येते. तालुक्यातीलच मच्छीमार असल्याने वेंगुर्ले बंदर व नवाबाग येथेही मासेमारी करता येते, असा गतवर्षी तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयाची पायमल्ली होत असल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.

पर्ससीनधारकांचा धुमाकूळ!

सध्या सुरू असलेल्या मासेमारी हंगामात पर्ससीनधारकांचा तालुक्यातील किनारपट्टीलगतच्या भागात धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसात याबाबत संबंधितांवर कारवाई न केल्यास पारंपरिक मच्छीमार आपल्या कुटुंबियांसमवेत तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.