|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सकस आहारासाठी केवळ सेंद्रिय शेतीवर अवलंबून चालणार नाही

सकस आहारासाठी केवळ सेंद्रिय शेतीवर अवलंबून चालणार नाही 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

मानवाला निरोगी आयुष्य मिळवायचे असेल तर त्यास सकस आहाराची गरज आहे. केवळ सेंद्रिय शेती वर अवलंबुन राहण्यापेक्षा वाढत्या लोकसंख्येचा विचार करता उंच तंत्रज्ञान विकसित करून अधिक उत्पादन शेतीतून घेणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱयाच्या घरात देशी गाय असलीच पाहिजे. ते त्याचे वैभव आहे. परंतु गोहत्या बंदीच्या विरोधात असून निकामी जनावरांची व्यवस्था ही लावावीच लागते, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

येथील भरत मेडिकल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा डॉ. एस. के. पाटील धन्वंतरी पुरस्कार अब्दुललाट येथील डॉ. अरूण गणेश कुलकर्णी यांना तर डॉ. जे. जे. मगदूम समाजभूषण पुरस्कार शिरोळ येथील पशुवैद्यकीय डॉ. आनंदराव हरि कदम यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, डॉ. एस. के. पाटील व डॉ. जे. जे. मगदूम यांनी गोरगरिबांची सेवा केली. त्यांची वैद्यकीय सेवा आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्याच भावनेतून आज भरत मेडिकल ट्रस्ट कार्यरत आहे. याचा सार्थ अभिमान आहे. केवळ आरोग्याच्या कारणावरून उटसूट भाजीपाला व फळ उत्पादन करणाऱया शेतकऱयांना आरोपिच्या पिंजऱयात उभे करणे योग्य नाही. शेतकरी जे पिकवतो, तेच तो खातो. भाजीपाला मोठय़ा प्रमाणात निर्यात होत आहे. मग या भाजीपाल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य कसे बिघडत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगे यांनी सेंद्रिय शेती व देशी गाईचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, केवळ सेंद्रिय शेतीतूनच कसदार अन्न मिळू शकेल. कोल्हापूर जिल्हा हा सेवाभावी व मल्लविरांचा आहे. येथे आधुनिक शेतीतून भरघोस पिक घेतले जाते. दुधाचा महापूरही येथे येतो. पण जनावरे कमी होत असताना दुधाचे उत्पादन कसे वाढते, याबाबत विचार करणे गरजेचे आहे. आज सर्वत्र कर्क रोगाने थैमान घातले आहे. क्षारपड जमिनीचा प्रश्न निर्माण होत आहे. लोकांच्या आहाराबाबत गांभिर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वत्र भेसळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच रोग प्रतिकार शक्ती कमी होत आहे. शेतीबरोबरच माणसाचे आरोग्यही धोक्यात आल्याचे सांगून त्यांनी निसर्ग प्रदुषित होवू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. शेतीच्या उत्पन्नासाठी देशी गाईचे कसे महत्व आहे, हेही त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ग्रामीण भागात चांगल्या प्रकारची रूग्णसेवा व पशुसेवा कशा पद्धतीने केली, त्याचे अनुभव डॉ. कदम व कुलकर्णी यांनी सांगितले. नगराध्यक्षा डॉ. निता माने यांनीही आपले मनोगते व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रमुख सत्कार मुर्तीच्याबरोबर स्वातंत्र्य सैनिक आदगोंडा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावकर मादनाईक, नगरसेविका असावरी आडके, मिलिंद साखरपे, प्रा. आण्णासो क्वाणे, शांतीनाथ पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, वैशाली पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, अनिलराव यादव, शैलेश चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला.

स्वागत प्रसन्ना कुंभोजकर यांनी तर प्रास्ताविक पैलवान विठ्ठलराव मोरे यांनी केले. भरत बँक व भरत मेडिकल ट्रस्टचे सर्व संचालक, सभासद, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. किरण अनुजे यांनी मानले.

हायटेक रूग्णवाहिका खासदार फंडातून

भरत मेडिकल ट्रस्टच्या कार्याने प्रभावीत झालो असून या ट्रस्टला तालुक्याची गरज ओळखून खासदार फंडातून हायटेक रूग्णवाहिका देण्याचे खासदार शेट्टी यांनी मान्य केले. तर डॉ. आनंदराव कदम यांनी पुरस्काराची मिळालेली रक्कम केरळ पूरग्रस्तांना जाहीर केली. तसेच डॉ. अरूण कुलकर्णी यांनी पुरस्कारा इतकीच रक्कम घालून ही रक्कम भरत मेडिकल ट्रस्टला परत दिली.

 

Related posts: