|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » फिरत्या कॅनव्हासवर चित्र रेखाटणारा ‘जादूगर’

फिरत्या कॅनव्हासवर चित्र रेखाटणारा ‘जादूगर’ 

चित्रकार समीर चांदरकर यांची हिंदी वाहिनीवर धडक

विशाल वाईरकर / कट्टा:

 सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि नामवंत चित्रकार समीर चांदरकर यांनी फिरत्या कॅनव्हासवर अवघ्या साडेतीन मिनिटांत तमाम मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले अन् ही कला पाहून हिंदी टीव्ही कलाकारही अवाप् झाले. त्यांनीही महाराजांच्या चित्राला सन्मानपूर्वक दाद दिली. निमित्त होते, ते सोनी सब टीव्ही चॅनेलवरील ‘इंडिया के मस्त कलंदर’ या रिऍलिटी शोचे.

 या शोसाठी देशभरातून 200 कलाकारांची निवड करण्यात आली होती. यात सिंधुदुर्गातून समीर चांदरकर यांची निवड झाली होती. या संधीचे सोने करून चांदरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे नाव रोशन केले. अशाप्रकारे एखाद्या टॅलेंट शोमधून राष्ट्रीय चॅनेलवर सिंधुदुर्गचे नाव झळकविणारे ते पहिले कलाकार ठरले आहेत. फिरत्या कॅनव्हासवर चित्र साकारणे ही कला सुद्धा तितकीच अवघड आहे. चांदरकर सावंतवाडी तालुक्मयातील नेमळे पोकळेनगरचे सुपुत्र आहेत.

  हिंदी रिऍलिटी शोमध्ये त्यांनी मराठी माणसाची वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. चांदरकर यांनी मी सिंधुदुर्ग येथून आल्याचे सांगताच या कार्यक्रमाचे परीक्षक, प्रसिद्ध पॉप गायक मिका सिंग यांनी ‘मी मराठी, मराठीसाठी जय महाराष्ट्र’ अशी दाद दिली. हा मराठी माणूस नेमके या रंगमंचावर काय सादर करणार आहे, हे त्यांना माहीत नव्हते. चांदरकर यांनी आपली अदाकारी दाखविण्यास सुरुवात केली आणि जसजसे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले जाऊ लागले, तसतसे त्यांच्या चेहऱयावरचे हावभाव बदलत गेले. जसे महाराजांचे चित्र काढून पूर्ण झाले आणि टाळय़ांचा एकच कडकडाट झाला. हिंदी गायिका गीता कपूर यांनी ‘तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार आहात’ अशी चक्क मराठीतून दाद दिली. 

 चांदरकर हे गेली 18 वर्षे कला क्षेत्रात कार्यरत आहेत. या कलेचे शिक्षण त्यांनी सिंधुदुर्ग कला महाविद्यालय येथे घेतले. प्रथम ते उत्कृष्ट रांगोळीकार म्हणून नावारुपास आले. कुणकेश्वर येथे साकारलेल्या रांगोळीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ते त्यांच्या आयुष्यातील पहिले पारितोषिक होते. त्या स्पर्धेत त्यावेळी राज्यातील अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते. रांगोळी कलेमध्ये त्यांनी तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीयस्तरावर जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व केले आहे. सातारा, सांगली येथे सलग तीन वर्षे त्यांनी प्रथम तीन क्रमांकांत स्थान मिळविले आहे. या कलेमुळेच त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाउंडेशन, मुंबई यांचा ‘महाराष्ट्र स्टेट ऍवॉर्ड 2017-18’ हा विशेष पुरस्कार मिळविला. चांदरकर हे सध्या कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

  सोनी सब टीव्ही वाहिनीवर प्रसारित झालेला या शोचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर हजारो चाहते लाईक करीत आहेत. अशीच कलाकारी त्यांनी या अगोदर झी मराठी वाहिनीवर सादर केली होती. त्याला 1 लाख 14 हजार लाईक मिळाले होते. त्यामुळे सिंधुदुर्गचे नाव उज्वल करणाऱया या सुपुत्राचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.