|Friday, July 19, 2019
You are here: Home » विविधा » आदर्श मित्र मंडळाला गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक

आदर्श मित्र मंडळाला गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक 

ऑनलाईन टीम / पुणे :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने चौथे तर कर्वेनगर येथील स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित यांनी पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १८७ मंडळांपैकी ८६ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टच्या वतीने एकूण ११ लाख ३९ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत केली. 
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ३१ रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. कार्यक्रमाला पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, पुण्याचे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत आदर्श मित्र मंडळाच्या जलसंवर्धन काळाची गरज आणि शेतकरी कर्जमाफी या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या सर्जिकल स्ट्राईक या देखाव्यास ४५ हजारांचे, काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या काल्पनिक गणेश मंदिराला ४० हजारांचे, महाराष्ट्र तरुण मंडळाच्या सैनिक हो तुमच्यासाठी या देखाव्याला ३५ हजारांचे आणि स्वतिश्री गृहरचना संस्थेच्या पंचतत्वाचा पर्यावरणपूरक समतोल या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले. 
अशोक गोडसे म्हणाले, ट्रस्टचे यंदा १२६ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या सर्व उपक्रमांत सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती www.dagdushethganpati.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच भाविकांनी सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, विजय चव्हाण, अनिल घाणेकर, राजन काळसेकर, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, मोहन शेटे यांसह सहाय्यक म्हणून चिंतामणी काळे, ओंकार वाघ, कमलेश खिंवसरा, वृषभ अंबिके, ॠषिकेश धनवडे, दीप राणे यांनी काम पाहिले.