|Friday, July 19, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » भारतात बायोफ्युएलवर पहिल्यांदाच उडाले विमान

भारतात बायोफ्युएलवर पहिल्यांदाच उडाले विमान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बायोफ्युएलवर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. स्पाइसजेट या विमान कंपनीने बॉम्बार्डियर क्यू 400 या विमानाची बायोफ्युएलवर डेहराडूनपासून दिल्लीपर्यंत यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबरोबरच बायोफ्युएलवर विमानाचे यशस्वी उड्डाण करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. तसेच बायोफ्युएलवर विमान उड्डाण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे. 

आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या विकसित देशांनीच बायोफ्युएलवर विमानउड्डाण करण्याचे तंत्र विकसित केले होते. मात्र हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा विकसनशील देशांपैकी पहिला देश ठरला आहे. या वर्षाच्या सुरुवातील बायोफ्युएलवर चालणाऱ्या पहिल्या विमानाने लॉस एंजलिस येथून मेलबोर्नकडे उड्डाण केले होते. 

आम्ही पहिल्या बायोफ्युएल जेट इंधनाच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी घेतली आहे. या उड्डाणासाठी वापरण्यात आलेल्या इंधनापैकी 75 टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल आणि 25 टक्के बायोफ्युएलचे मिश्रण होते, असे स्पाइसजेटने सांगितले.