|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिह्यात 14 हजार नवे मतदार!

जिह्यात 14 हजार नवे मतदार! 

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर

12 लाख 28 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण

सुसूत्रीकरणामध्ये जिह्यात 1699 मतदान केंद्रे

प्रतिनिधी /रत्नागिरी

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीत नाव नोंदवणे, वगळणे व दुरूस्तीची अंतिम संधी कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर असा आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी 100 टक्के घरभेटी पूर्ण झाल्याची माहिती नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिह्यात 14 हजार 28 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

2019 च्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे उपस्थित होते.

15 मे ते 20 जून 2018 या कालावधीत घरभेटीचे काम 100 टक्के पूर्ण करण्यात आले आले. जिह्यातील 12 लाख 28 हजार 489 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये यादीत फोटो नसलेले 342 मतदार होते त्यापैकी 198 मतदार हे मयत किंवा स्थलांतरीत असल्याचे आढळल्याने त्यांची नावे कमी करण्यात आली आहेत. उर्वरित 144 मतदारांचे रंगीत फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. स्थलांतरीत, मयत व दुबार नोंद असलेल्या 8 हजार 648 मतदारांची वगळणी 10 जानेवारी 2018 ते 27 ऑगस्ट 2018 या कालावधीत करण्यात आली. 14 हजार 28 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

या मतदार यादीत 2 लाख 51 हजार 331 मतदारांचे कृष्ण धवल फोटो होते त्यापैकी 1 लाख 73 हजार 722 मतदारांकडून रंगीत फोटो प्राप्त करण्यात आले असून यापैकी 1 लाख 50 हजार 410 रंगीत फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. उर्वरीत मतदारांकडून लवकरच फोटो प्राप्त करून ते यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘सुलभ निवडणुका’ंसाठी प्रशासनाची तयारी

चालू वर्षाचे भारत निवडणूक आयोगाचे ब्रीद वाक्य ‘सुलभ निवडणूका’ असे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक, विविध शासकीय कार्यालये तसेच दिव्यांग नागरिकांसाठी काम करणाऱया स्वयंसेवी संस्थाकडून 8 हजार 931 दिव्यांग व्यक्तींची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांची संख्या जास्त आहे अशा मतदान केंद्रांवर व्हील चेअर, स्वयंसेवक आदी सुविधा पुरवण्याचा निवडणूक आयोगाचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

मतदानकेंद्रांचे सुसूत्रीकरण

सुसूत्रीकरणाअंती विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे,

दापोली- 361

गुहागर-321

चिपळूण-334

रत्नागिरी-345

राजापूर-338

एकूण-1699

या 1699 मतदान केंद्रांची प्रारूप मतदार यादी 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी लिहिणार प्रत्येक विद्यार्थ्याला पत्र!

2019 मध्ये येऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाविषयी जनजागृती व्हावी तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी पुढे यावे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ते पत्र लिहिणार आहेत.

मतदान जागरूकता अभियान दरवेळी राबविले जाते मात्र काही लोक मतदानाचा हक्क बजावत नाहीत. विद्यार्थ्यांच्या मदतीने यासाठी जनजागृती करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी सूचनेचे तंतोतंत पालन करतात व त्या पालकांपर्यंत पोहोचवतात. यासाठी शाळेतील मुलांना पत्र लिहून मतदानाचे महत्व विशद करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय गणेश मंडळे, महिला बचतगट आणि पोस्टर्स, फलकांच्या माध्यमातूनही मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. मतदानाविषयीचा संदेश देण्याच्या सूचना गणेश मंडळांना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येतील असेही चव्हाण यांनी सांगितले. अलीकडे सोशल मिडियाचा अधिक प्रभाव असल्याने याचा उपयोग करून घेतला जाणार आहे. महाविद्यालयात शिबीरे घेण्यात येणार असून जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासन सर्वच घटकांचे सहकार्य घेणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या जनजागृती उपक्रमात सहभागी व्हाव,s असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.