|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘जैतापूर’विरोधात मच्छीमार बांधवांचा पुन्हा एल्गार

‘जैतापूर’विरोधात मच्छीमार बांधवांचा पुन्हा एल्गार 

अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार

‘जेलभरो’द्वारे प्रकल्प विरोधक आक्रमक

वार्ताहर /राजापूर

जमीन आमच्या हक्काची.. समुद्र आमच्या हक्काचा …. सर्वांनी गर्जा, नको अणुऊर्जा.. अणुऊर्जा हटाओ, कोकण बचाओ.. अशा जोरदार घोषणा देत मच्छीमार बांधव व प्रकल्पविरोधकांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा एल्गार दिला. आंदोलकांनी जेलभरो आंदोलन करत अणुऊर्जा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत लढा कायम राहिल, असा निर्धार व्यक्त केला.

राजापूर तालुक्यातील अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात गेली सुमारे 12 वर्षे लढा सुरू आहे. मात्र तत्कालीन काँग्रेस व आताचे भाजप सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आग्रही आहे. मध्यंतरी सुमारे 90 टक्के प्रकल्पग्रस्तांनी जमिनीचा मोबदला स्वीकारल्याने हा प्रकल्प मार्गी लागल्याचे चित्र निर्माण झाले होती. मात्र जनहक्क समितीने मच्छीमार व प्रकल्प विरोधकांच्या माध्यमातून हा लढा सुरूच ठेवला आहे.

याच लढय़ाचा एक भाग म्हणून जनहक्क समितीच्या वतीने सोमवारी जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. सकाळी 11 वाजता तबरेज चौकापासून आंदोलनाला सुरुवात झाली. सुरूवातील तबरेज सायेकर या मच्छिमार बांधवाला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रकल्पविरोधी घोषणा देत आंदोलक प्रकल्पस्थळाच्या दिशेने निघाले. मात्र माडबनच्या सडय़ावर पोलीसांनी प्रकल्पग्रस्तांना अडविल्यामुळे सोनारगडगा येथे प्रकल्पग्रस्तांनी कॉर्नर सभा घेतली.

यावेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी, जनहक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, मन्सूर सोलकर, मच्छीमार नेते अमजद बोरकर, अलिमिया म्हसकर आदींनी आपले विचार मांडले. विकासाच्या नावाखाली कोकण भकास करण्याचा शासनाचा डाव आहे. या प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत प्रकल्पविरोधी लढा सुरू ठेवणार असल्याच्या भावना प्रकल्प विरोधकांनी यावेळी व्यक्त केल्या.

या आंदोलनामध्ये राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, माजी जि.प.शिक्षण व अर्थ सभापती दीपक नागले, राजापूर तालुका पंचायत समिती सभापती अभिजित तेली, उपसभापती प्रशांत गावकर, जिल्हा परिषद सदस्या मंदा ताई शिवलकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, शाखाप्रमुख मजीद गोवळकर, साखरी नाटे सरपंच नौशाद धालवेलकर, इरफान कोतवडकर, नदीम टमके, माडबन सरपंच मनीषा खडपे, जैतापूर सरपंच रेखा कोंडेकर, राजन कोंडेकर, सचिन वाघधरे ,बाळू साखरकर यांच्यासह मच्छीमार, शेतकरी बांधव व प्रकल्पग्रस्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

साखरीनाटेतील मच्छीमार बांधवांनी मच्छीमारी बोटी बंद ठेवत आंदोलनाला आपला सहभाग दर्शविला. साखरीनाटेतील बाजारपेठेतही शुकशुकाट होता. आंदोलनामुळे परिसरात कलम 144 अन्वये बंदी आदेश जारी करण्यात आले होते. मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. त्यानंतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून त्यांना सोडण्यात आले.