|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तक्रार निवारण अधिकारी नेमा!

तक्रार निवारण अधिकारी नेमा! 

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र-व्हॉट्सऍपला नोटीस

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

देशात आतापर्यंत तक्रार निवारण अधिकारी का नेमला नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपला केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सऍप, माहिती तसेच प्रसारण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाला नोटीस बजावत 4 आठवडय़ांत स्पष्टीकरण देण्याचा निर्देश दिला आहे. केंद्र सरकारने व्हॉट्सऍपला भारतात काम करण्यासाठी स्थानिक शाखा तयार करणे आणि बनावट संदेशांचा स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक व्यवस्था उभारण्यास सांगितले होते. परंतु व्हॉट्सऍपने संदेशांचा स्रोत उघड करण्यास नकार दिल्याचे वृत्त दिले आहे.

बनावट संदेशांमुळे देशात जमावाचा वाढता हिंसाचार पाहता माहिती तसेच प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मागील आठवडय़ातच व्हॉट्सऍपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल यांच्याशी चर्चा केली होती. प्रसाद यांनी कंपनीला देशात त्वरित तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याची सूचना केली होती. या चर्चेवेळी व्हॉट्सऍपने बनावट संदेशांचा प्राथमिक स्रोत शोधण्यासाठी नवे वैशिष्टय़ सादर करण्याची तयारी दर्शवली होती. वापरकर्त्याच्या डाटापर्यंत कंपनी पोहोचू शकत नाही, तसेच यात करण्यात आलेली छेडछाड त्याच्या खासगीत्वात हस्तक्षेप ठरेल, अशी भूमिकाही व्हॉट्सऍपने मांडली होती.

व्हॉट्सऍप तक्रार निवारण अधिकाऱयाच्या नियुक्तीची तरतूद तसेच भारताच्या अन्य कायद्यांचे पालन करत नसल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आला होता. न्यायाधीश आर.एफ. नरीमन आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने ‘सेंटर फॉर अकौंटेबिलिटी अँड सिस्टेमिक चेंज’च्या याचिकेवर पेंद्र आणि व्हॉट्सऍपला नोटीस बजावली आहे.