|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नगरसेवक आता धोरणापुरतचे

नगरसेवक आता धोरणापुरतचे 

स्थायी समितीला अमर्याद कामे मंजुरीचे अधिकार : शासनाच्या निर्णयाने सर्वसाधारण सभेचे महत्व कमी 

स्थायी समितीला दिलेले अधिकार अयोग्य असून सर्वसाधारण  सभेतच विकासकामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया आवश्यक होती -बबन साळगावकर, नगराध्यक्ष

वार्ताहर / सावंतवाडी:

शहरातील विकासकामे मंजूर करण्यासाठी आता पालिका बैठकीची आवश्यकता लागणार नाही. तर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतच अमर्याद विकासकामांना मंजुरी देण्याचे अधिकार शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे मासिक बैठकांचे महत्व कमी होणार आहे. थेट नगराध्यक्ष निवडीनंतर आता शासनाने स्थायी समितीकडेच अमर्याद रकमेच्या कामांना मंजुरीचे अधिकार दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सावंतवाडी नगरपालिकेने केली असून जवळपास 2 कोटी 62 लाख 63 हजर 149 रुपयांच्या विकासकामांना स्थायी समितीत मंजुरी दिली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, स्थायी समितीला दिलेले अधिकार अयोग्य असून सर्वसाधारण सभेतच विकासकामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया आवश्यक होती. आता फक्त सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना धोरण ठरवण्याएवढाच अधिकार राहिला आहे. शासनाच्या या धोरणावर साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली.

एक लाखावरून अमर्याद

पूर्वी स्थायी समितीला एक लाख रुपयांपर्यंत कामांना मंजुरीचे अधिकार होते. ते वाढवून अमर्यादीत रकमेच्या कामांना मंजुरीचे अधिकार दिले आहेत. या नव्या अध्यादेशामुळे नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आली आहे. सावंतवाडी नगरपालिकेची स्थायी समितीची सभा नुकतीच झाली. या सभेत या नव्या अध्यादेशानुसार जवळपास अडीच कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

थेट नगराध्यक्ष निवडीमुळे निर्णय

नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, स्थायी समितीत रस्ते, संरक्षक भिंत, गटार आदी 35 हून विकासकामांना मंजुरी दिली आहे. शासनाने नवे धोरण आखताना अमर्यादीत विकासकामांना मंजुरीचे अधिकार दिले असले तरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अधिकार हिरावून घेतले आहेत. यापुढे सर्वसाधारण सभा फक्त धोरण ठरविण्यापुरती राहणार आहे. आपण या निर्णयावर नाराज आहोत. काही पालिकांमध्ये थेट नगराध्यक्ष एका पक्षाचे तर सदस्य अन्य पक्षाचे निवडून आल्याने स्थायी समितीला अधिकार दिले असावेत, असे साळगावकर म्हणाले.

नगरसेवकांचे अधिकार हिरावले!

शासनाने थेट नगराध्यक्ष निवड प्रक्रियेनंतर आता नव्याने स्थायी समितीला विकासकामे मंजुरीचे अधिकार दिल्याने सत्ताधारी पक्षाला विकासकामे मंजूर करण्यास गती मिळणार आहे. विरोधी नगरसेवकांची बैठकातील उपस्थिती नामधारीच राहणार आहे. स्थायी समितीला अधिकार दिल्यामुळे आता दर महिन्याच्या स्थायी समिती बैठकीला महत्व येणार आहे.

ठेकेदार रस्त्यांची कामे करून देणार

साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहरातील चार-पाच रस्ते खराब झाले होते. या रस्त्यांच्या ठेकेदारांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत नोटिसा पाठवताच सर्व ठेकेदारांनी खराब झालेले रस्ते पावसाळय़ानंतर पूर्ववत करून देण्याचे स्पष्ट केले आहे. सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा भागात 87 गुंठे जागेत 76 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. केवळ 20 झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. असे असताना बेकायदेशीर काम केले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली जाणार असल्याचे साळगावकर यांनी स्पष्ट केले.

Related posts: