|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपात प्रशासकीय बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपात प्रशासकीय बैठक 

महापौराच्या अध्यक्षतेखाली महामंडळ व अधिकाऱयांची बैठक

प्रतिनिधी / बेळगाव

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची डागडूजी करण्यात यावी. तसेच पथदिप दुरूस्ती व मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडणे अशा विविध मागण्या मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने महापौरांकडे करण्यात आल्या आहेत. यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी गुरूवार दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता महामंडळाचे पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱयांची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

शहरात 360हून आधिक सार्वजनिक उत्सव मंडळे आहेत. मंडळांना जिल्हाप्रशासनाकडून मंडप परवानगी, ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस परवानगी, तसेच हेस्कॉमकडून विद्युत जोडणी आदीकरीता धावपळ करावी लागत आहे. या तिन्ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास मंडळाच्या कार्यकर्त्याची धावपळ थांबणार आहे. शहरातील रस्त्याची चाळण झाली असल्याने दुरूस्तीची कामे तातडीने  करण्याची गरज आहे. मंडप घालण्यात येणाऱया जागा स्वच्छ करणे, मिरवणूक मार्गात अडथळा ठरणारे विद्युत वाहिन्या व खांब हटविण्याची गरज आहे. आवश्यक ठिकाणी पथदिप लावणे, शहरात पुरूष व महिलाकरीता स्वच्छतागृहाची उभारणी करणे, हेल्पलाईन उपलब्ध करण्याची करण्याची आवश्यकता असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, हेस्कॉम, पोलीस प्रशासन, पाणी पुरवठा मंडळ, टेलीफोन खाते, वनखाते, बुडा, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांसमवेत गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी समस्यांचे निवारण करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच मनपाच्या चारही स्थायी समिती अध्यक्ष,सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.