|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

राहू कालाचे महत्त्व

बुध. दि. 29 ते 5 सप्टेंबर 2018

राहूकाल आहे महत्त्वाची व मोठी कामे करू नका. संकटे येतील असे अनेकजण म्हणताना ऐकला असाल. ज्योतिषशास्त्रात शापयोनि, प्रेतयोनि, देवयोनि, यक्षयोनि असे अनेक प्रकार आहेत. त्यांचा संबंध राहूकालाशी आहे. राहुकाल, यमगंडकाल व गुलीककाल हे अतिशय महत्त्वाचे आहेत. राहूकाल कोणत्या कामासाठी यमगंडकाल कशासाठी व गुलीककाल कशासाठी पहातात, हेच कित्येकांना माहीत नसते. त्यामुळे राहू काल आहे, शुभ कामे करू नका, असे सांगून लोक मोकळे होतात. वास्तविक राहूकाल हा अशुभ का मानलेला आहे. त्या त्या वारी त्या दिवशीच्या राहूकालामुळे नक्की कोणते शापीत दोष निर्माण होतात, त्याचा अभ्यास होणे अति महत्त्वाचे ठरते. त्याचे परिणाम काय होतात यावर नव्याने संशोधन होण्याची गरज आहे. राहू कालाचे दृकप्रत्ययही येतात. हल्लीच्या काळाला अनुसरून त्याचा व्यावहारिक वापर कसा करून घ्यावा याचे ज्ञान झाल्यास जीवनातील अनेक अवघड समस्या सुटू शकतात. गुलीककाल हा शुभ मानलेला आहे. पण खरोखरच तो शुभ आहे का हे पहाणेही आवश्यक आहे. यमगंडकाल अत्यंत अशुभ मानतात. त्या योगावर जर अपघात किंवा दुर्घटना अथवा तत्सम प्रकार घडल्यास प्राणांतिक संकटे येऊ शकतात. पण नक्की तसे घडते का पहावे लागेल. क्यतिपात वैधृती संक्रांती, करिदिन, ग्रहणे या काळात जर काही महत्त्वाच्या घटना घडल्यास त्या लिहून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे पुढील पिढीला त्याचा अभ्यास करता येईल. आश्लेषा नक्षत्रावर जन्म असेल तर सासूला त्याचा त्रास होतो, असे म्हणतात. पण त्याचे वैधानिक सत्यता कुणी पारखली आहे काय? मूळ नक्षत्राच्या व्यक्तीमुळे त्रास होतो, पण तो का होतो याचा अभ्यास कोण करणार? लग्नाच्यावेळी मंगळ आहे म्हणून पत्रिका बाजूला सारली जाते. पण पंचांगातच मंगळ शुभ किंवा अशुभ हे स्वच्छ लिहिलेले असूनही लोक पंचांगाचा अभ्यास का करीत नाहीत? हा गूढ प्रश्न आहे. एकाला मंगळ आहे दुसऱयाला नाही पण तरीही  संसार सुखात चालले आहेत. एकनाडी दोष असूनही भाग्यवान संतती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. गुरुपुष्यामृत योगावर लग्न करू नये असे म्हणतात पण त्या योगावर विवाह केलेली  अनेक जोडपी आज अत्यंत सुखात लोळत आहेत. या साऱयामागील कारणमिमांसा पाहिल्यास कुठेतरी त्रूटी आहेत हे जाणवते. पत्रिकेत राजयोग असूनही ते लोक अन्नाला महाग आहेत. गजयोग अश्वयोग असूनही काही लोकाकडे साधी सायकलही नाही ही विसंगती का तयार होते? कोणते दोष यांना नडतात? या साऱयाचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून होईल. त्याचवेळी या शास्त्राला बावनकशी सोन्याची झळाळी येईल. आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकवता का असे अनेक लोक विचारतात पण त्यासाठी कठोर तपश्चर्या व गुरुचा आशीर्वाद व पूर्वजन्मातील सुकृत असावे लागते. व्यसनापासून दूर रहावे लागते. ज्याला ज्योतिषशास्त्रात पारंगत व्हायचे असेल त्यानी हंस क्षीर वृत्तीने तसेच समाजाचे भले व्हावे ही भावना ठेवली पाहिजे. कोणताही ग्रह आपणहून कुणाचे कधीही वाईट करीत नसतो. पण त्याचा अपमान झाल्यास तो सोडणार नाही. यासाठी कुणीही कोणत्याही ग्रहाला चुकूनही वाईट म्हणू नये. आजकाल पैसे टाकले की कुणालाही ज्योतिषशास्त्राची डिग्री मिळते असे म्हणतात पण पत्रिकेतील राहू हा अशा लोकांना हसत असतो व ज्यावेळी वेळ फिरते त्यावेळी राहू काळातच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात.

मेष

विद्वान सर्वत्र पुज्यते ही उक्ती तुमच्या बाबतीत या सप्ताहात खरी ठरेल. अकल्पित भाग्योदय होईल. शत्रू आपणहून थंड पडतील. महत्त्वाच्या अडचणीच्यावेळी शासकीय अधिकारी सहाय्य करतील, तसेच विचारशक्तीमुळे तुमचे मुद्दे खोडणे, काहीजणांना कठीण जाईल, पण शेजारी नातलग व भावंडे यांच्याशी पटणार नाही, एखाद्या भावंडाची जबाबदारी सांभाळावी लागेल.


वृषभ

कुणाचाही विरोध सहज  मोडून काढाल. काही जुनाट आजारावर कायमस्वरुपी मार्ग निघेल. प्रेमप्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले, अन्यथा नको ते आरोप येऊ शकतील. बाधिक दोष, विषारी किटक, सर्पदंश यापासून धोका. वडीलोपार्जित संपत्ती असेल तर त्यात घोटाळे निर्माण होतील. एखाद्याला मदत करायला जावून संकटात पडाल. पोलीस केसेसपासून जपा.


मिथुन

हाती घेतलेल्या सर्व कामात चांगले यश मिळवाल. पण मित्रमंडळींच्या सल्यापासून दूर रहावे, अन्यथा गोत्यात याल. शिक्षणात अडथळे येतील. संततीपासून त्रास होऊ शकेल. कलाकौशल्याच्या कामात उत्तम योग. पोटात व कंबरेत काही तरी होत आहे, असे सतत वाटत राहील. प्रवास घडतील. वैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उद्भवतील.


कर्क

मोठमोठे उद्योगधंदे, नोकरी, यात मनासारखे यश मिळवाल. पुढे घडणाऱया काही घटनांची पूर्वसूचना मिळेल. आठवडा सर्व बाबतीत यश  देणारा आहे. नोकरी व्यवसायात जर काही समस्या असतील तर त्या सुटतील. देण्याघेण्याच्या व्यवहारातून संघर्ष होण्याचे योग दिसतात. लांबचे प्रवास, सहली टाळण्याचा प्रयत्न करा.


सिंह

सहज केलेली चेष्टा, थट्टामस्करी अंगलट येईल. काळजी घ्यावी. प्रवासात त्रास कागदोपत्री व्यवहार मात्र यश देणारे ठरतील. मुलाबाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. जे काम हाती घ्याल त्यात दैवी साहाय्याचा भाग राहील. काहीजणांना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. कुणालाही शब्द देताना त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्या.


कन्या

दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. देवधर्माच्या कृत्यात चांगले यश मिळेल. देवघर ईशान्येला असेल तर निश्चित या आठवडय़ात शुभ व लाभदायक घटना घडतील. सरकारी कामात मोठे यश देणारा सप्ताह. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. घरगुती समस्या कमी होतील.

तुळ

तुमचे अनेक किचकट प्रश्न या आठवडय़ात सुटतील. पण त्या दृष्टीने तुमचे प्रयत्नही हवेत. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल योग. संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. एखाद्याचे भले करण्यास जावे तर त्यानेच आपल्यावर नको ते आरोप घालावेत असे प्रकारही यावेळी घडण्याची दाट शक्मयता. स्वत:चा बचाव करून इतरांना सहाय्य करा.


वृश्चिक

अचानक धनलाभ, संततीचा उत्कर्ष, प्रवासात लाभ, नवनव्या कार्यक्षेत्रात, प्रवेशाच्या दृष्टीने चांगले योग. वाहन जपून चालवा. दुर्घटना घडण्याची शक्मयता राहील. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल. महत्त्वाची सरकारी कामे मात्र  जरा जपून करावीत. उत्तरार्धात अनेक महत्त्वाच्या घटनांचा शुभारंभ होईल.


धनु

काही जणांच्या आगमनामुळे घरात सतत अस्वस्थ वाटत राहील. मुलाबाळांच्या दृष्टीने जरा त्रासदायक. पण धनलाभ  व इतर बाबतीत मोठे यश, अनेक महत्त्वाचे जटिल प्रश्न सोडविण्यास अनेकजण पुढे येतील. धनलाभाच्या नवनव्या संधी येतील. काही गुप्तशत्रंgकडून महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होतील.


मकर

तुमच्याबद्दलचे सर्व गैरसमज दूर होतील. अवघड कामाची सुरुवात करू शकाल. सांसारिक सौख्यात वाढ होईल न जुळणारे लग्न ठरेल. बोलण्याचालण्यातून काही नव्या समस्या निर्माण होतील. त्यासाठी विचारपूर्वक वागावे. एखादा गंभीर रुग्णाला मदत करण्याची वेळ येईल. शेजारी व नातेवाईक यांच्याशी असलेले संबंध सुधारतील.


कुंभ

एखाद्या अतिमहत्त्वाच्या व कठीण कामात यश मिळेल, पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च करावे लागतील. वर्षसमाप्तीच्या पंधरवडय़ात विचित्र घटना घडतील. अपेक्षा नसताना एखादी महत्त्वाची शुभ वार्ता ऐकू येईल. वास्तू संदर्भात चांगले योग पण सरकारी कामे, परमिशन, महत्त्वाच्या वाटाघाटी करताना काळजी घ्या.


मीन

धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल व मुलाबाळांचा भाग्योदय होईल. वैवाहिक जीवनाला शुभ कलाटणी देणारे योग. अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांत वितंडवाद होतील. मालमत्तेच्या वाटण्यासंदर्भात वादावादी. वैवाहिक जीवनात संशयी वातावरणामुळे काही तरी गोंधळ उडण्याची शक्मयता. मन शांत ठेवून वागणे आवश्यक. व्यवसायाच्या बाबतीत चांगले योग.