|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » साटेलीत किरकोळ वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला

साटेलीत किरकोळ वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला 

तरुण गंभीर जखमी : संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी:

तालुक्यातील साटेली (देवळसवाडी) येथे सोमवारी रात्री किरकोळ कारणाच्या वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने सद्गुरू कृष्णा नाईक (48) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तेथील ज्ञानेश्वर गंगाराम सावंत याला तात्काळ अटक केली. त्याला आज मंगळवारी सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी व संशयित ज्ञानेश्वर सावंत हे एकाच वाडीतील आहेत. सोमवारी सायंकाळी जखमी सद्गुरू नाईक यांची पुतणी बाजारपेठेत गेली होती. त्यावेळी संशयिताने तिला शिवीगाळ केली म्हणून तिच्या घरातील नातेवाईकांनी संशयिताच्या घरी जाऊन विचारणा केली. याचा राग मनात धरून झालेल्या बाचाबाचीत ज्ञानेश्वर सावंत याने सद्गुरू नाईक यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करताना तो वार चुकविताना कोयता डाव्या खांद्यावर बसला. त्यात गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले. तात्काळ जखमी सद्गुरू नाईक यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हालविण्यात आले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस यांनी दिली. तात्काळ पोलिसांनी संशयित ज्ञानेश्वर सावंत याला अटक केली. तसेच गुन्हय़ात वापरलेला कोयता हस्तगत केला. न्यायालयाने संशयित ज्ञानेश्वर सावंत याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सावंत करीत आहे.