|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रेल्वेतील चोरीप्रकरणात तिघांच्या मुसक्या आवळल्या

रेल्वेतील चोरीप्रकरणात तिघांच्या मुसक्या आवळल्या 

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई : ‘मत्स्यगंधा’तील चोरीची दिली कबुली : दोन नांदेड, तर एक कोल्हापूर जिल्हय़ातील : रेल्वेत चोरी करणारी टोळी असण्याची शक्यता : तिघांनाही पोलीस कोठडी

वार्ताहर / कुडाळ:

 सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ातील रेल्वेतील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागा (सिंधुदुर्ग) च्या पथकाने तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्या संशयितांनी मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या चोरीची कबुली दिली. संशयितांपैकी दोन नांदेड, तर एक कोल्हापूर जिल्हय़ातील आहे. त्या तिघांना सोमवारी रात्री कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वेत चोरी करणारी ही टोळी असण्याची शक्यता आहे.

 प्रकाश अश्रूबा नागरगोजे (21, रा. बीड), तानाजी शिवाजी शिंदे (21, रा. हिंगोली) व महेश चाळू किल्लेदार (28, रा. आजरा-कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. या तिघांनाही मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

टोळी परजिल्हय़ातील असल्याची मिळाली खबर

 जिल्हय़ात रेल्वेत चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यांचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहे. हे गुन्हे करणारी टोळी परजिल्हय़ातील असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरविली. काही संशयितांची नावेही तपासात पुढे आली. प्रकाश नागरगोजे याचा अशा गुन्हय़ात हात असल्याचे निष्पन्न होताच प्रथम त्याला नांदेड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये 14 जून 2018 रोजी कुडाळ दरम्यान घडलेली चोरी त्याने व त्याच्या साथीदाराने केल्याचे उघड झाले होते. त्याच्याकडून तानाजी शिंदे व महेश किल्लेदार या संशयितांची नावे पुढे आली. नंतर त्या दोघांनाही ताब्यात घेतले.

चोरीतील मोबाईल जप्त, दागिने नांदेडला विकले

 मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना प्रमोदकुमार राम (40, रा. कर्नाटक) यांच्याकडील चार हजार रु., चौदा ग्रॅम सोन्याचे दागिने व मोबाईल असा ऐवज चोरटय़ाने लंपास केला होता. याबाबत कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल होता. या गुन्हय़ाची कबुली या संशयितांनी दिली असून चोरीतील मोबाईलही पथकाने नागरगोजे याच्याकडून जप्त केला आहे, तर सोन्याचे दागिने नांदेड येथे विकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

 स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  फडणीस यांच्यासह रवी इंगळे, संकेत खाडये, ज्ञानेश्वर कांदळगावकर व अमित तेली यांनी या कारवाईत भाग घेतला.

अन्य साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता

 सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात रेल्वे प्रवासात घडलेल्या चोऱयांच्या गुन्हय़ात सराईत टोळी असण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्हय़ांदरम्यान रेल्वेतील अशा गुन्हय़ांची कबुलीही या संशयितांनी दिल्याचे समजते. त्यामुळे पोलीस तपासात अन्य साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकाश नागरगोजे याच्यासह तिघांना कुडाळ पोलिसांनी काल रात्री अटक केली. तपास हवालदार ज्योती दूधवडकर करीत आहेत.

Related posts: