|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगड बंदरात आश्रयासाठी 93 नौका दाखल

देवगड बंदरात आश्रयासाठी 93 नौका दाखल 

देवगड तहसीलदार पाटील यांच्याकडून मच्छीमारांच्या व्यवस्थेची पाहणी : सुमारे 700 खलाशांचा समावेश

वार्ताहर / देवगड:

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळीसदृश स्थिती निर्माण झाली होती. सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून देवगड बंदरात सुमारे 93 मच्छीमार नौकांनी मंगळवारी आश्रय घेतला. सुमारे सातशे खलाशी कर्मचारी या नौकामध्ये असून त्यांच्या पुढील व्यवस्थेची पाहणी व विचारपूस देवगड तहसीलदार सौ. वनिता पाटील यांनी प्रत्यक्ष देवगड बंदरात सायंकाळी जाऊन केली.

सोमवारपासून समुद्रामध्ये वादळीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. किनारीभागात वेगाने वारे वाहत होते. खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आदेश बंदर विभागाच्यावतीने देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारपासून देवगड बंदरात गुजरात, कर्नाटक, रत्नागिरी, मुंबई या भागातील नौकांनी आश्रय घेण्यास सुरुवात केली होती. देवगड तहसीलदार सौ. पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी बंदरात दाखल झालेल्या 93 नौकांमधील खलाशी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याकडे पुरेसे जेवणाचे साहित्य उपलब्ध आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, अशी मागणी केली. त्यानुसार तहसीलदार यांनी देवगड नगरपंचायतीला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे देवगड नगरपंचायतीच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात आला. तहसीलदार सौ. पाटील यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक श्री. साळुंखे, बंदर अधिकारी श्री. पाटील, मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, मंडळ अधिकारी ए. एस. कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण,  तलाठी व्ही. एम. कांबळे, अव्वल कारकून एस. के. स्वामी आदी उपस्थित होते. दरम्यान मंगळवारी सायंकाळी समुद्रामधील वातावरणात बदल घडल्याचे दिसत असून वादळसदृश स्थिती निवळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बुधवारी या नौका पुन्हा मासेमारीसाठी रवाना होतील, असा विश्वासही तहसीलदार सौ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.