|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भाजपकडून लोकसभा स्वबळावर शक्य!

भाजपकडून लोकसभा स्वबळावर शक्य! 

लोकसभा मतदारसंघ प्रभारी, आमदार प्रसाद लाड यांची माहिती : ‘स्वाभिमान’सोबत युतीचा निर्णय राज्यस्तरावर! : राणेंचा रिफायनरीचा विरोध मावळेल!

वार्ताहर / कणकवली:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. स्वाभिमानसोबत या निवडणुकीत युती करण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाऊ शकतो. मात्र, राणेंच्या अटी मान्य झाल्या, तर युती होईल. नाही झाली, तर आमच्यासोबत जे येतील, त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविली जाईल. मात्र, भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येकावर जबाबदाऱया देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांची नावे केंद्रीय निवड समितीकडे पाठवून समितीच्या माध्यमातूनच उमेदवार निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी दिली.

येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत लाड बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश सरचिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश पारकर, सावंतवाडी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, राजश्री धुमाळे, राजू राऊळ, राजेंद्र म्हापसेकर, प्रभाकर सावंत, नीलेश तेंडुलकर, विजय केनवडेकर आदी उपस्थित हेते. जिल्हय़ातील आठही तालुक्यांना विकासकामांसाठी दोन महिन्यांत 10 कोटीचा निधी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे लाड यांनी सांगितले.

लाड म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष बळकट करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर वैयक्तिक जबाबदाऱया देण्यात आल्या आहेत. यात मतदार नाव नोंदणी, लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमबीप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेची आठ तालुक्यांत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याचीही जबाबदारी तालुकाध्यक्षांवर देण्यात आली आहे. तालुका प्रभारी म्हणून देवगड-जयदेव कदम, वैभववाडी-प्रमोद रावराणे, कणकवली-राजन चिके, कुडाळ-राजू राऊळ, मालवण-विलास हडकर, वेंगुर्ले- यशवंत आठलेकर, सावंतवाडी-शामकांत काणेकर, दोडामार्ग-राजेंद्र म्हापसेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हा संयोजक म्हणून प्रमोद जठार, सोशल मीडिया सेल-प्रभाकर सावंत, प्रसिद्धीप्रमुख-नीलेश तेंडुलकर, लाभार्थी संपर्क-अनिल सावंत, रश्मी लुडबे, लिगल सेल-सिद्धार्थ भांबुरे यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कणकवली विधानसभा प्रभारी म्हणून संदेश पारकर, कुडाळ-मालवण अतुल काळसेकर, सावंतवाडी-राजन तेली यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. मतदार नोंदणी प्रमुख म्हणून अतुल रावराणे काम पाहणार आहेत. भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या संयोजकपदी लॉरेन्स मान्येकर व सहसंयोजक म्हणून अब्दुलगनी मुजावर यांची निवड करण्यात आली. जिल्हय़ातील भाजपच्या सरपंच, ग्रा. पं. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प., पं. स. सदस्य आदी लोकप्रतिनिधींना सक्रिय करणार असल्याचे लाड यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडून शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशप्रसंगी घेण्यात आलेली फी शासन परत करणार आहे. तसा निर्णय शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजप प्रवक्ते काका कुडाळकर यांची नाराजी दूर करण्यात येईल. आवश्यकता असल्यास प्रदेशाध्यक्षांसोबत त्यांची चर्चा करून देण्यात येईल, असे लाड म्हणाले.

महामार्गाला वाजपेयींच्या नावाचा ठराव!

राष्ट्रीय महामार्ग 66 ला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते बैठकीत घेण्यात आल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले. हा महामार्ग चार राज्यांना जोडणारा असून याबाबत तसा ठराव करत भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ठरावाची प्रत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वबळावर लढायला काय हरकत?

सर्वच पक्ष स्वबळाची भाषा करीत असतील, तर भाजपलाही स्वबळावर लढायला काय हरकत आहे, असा प्रश्न करीत केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांना जरी उमेदवारी देण्यात आली, तरी कार्यकर्ते त्यांना निवडून आणतील. लोकसभेबरोबरच विधानसभेचे जिल्हय़ातील तीनही आमदार भाजपचेच असतील, असे लाड म्हणाले.

राणेंच्या रिफायनरी विरोधाचा अभ्यास करू!

बैठकीत नाणार ग्रीन रिफायनरीबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. मात्र, नारायण राणेंचा या रिफायनरीला होत असलेला विरोध येत्या काळात लवकरच मावळेल. राणेंचा रिफायनरीला कशासाठी विरोध आहे, त्याचा आम्ही अभ्यास करू. त्यांचा विरोध मावळण्यासाठी माझाही सहभाग असेल, असे लाड यांनी सांगितले