|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे

मालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे 

महिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपीस्ट रश्मी पवार यांनी ‘तरुण भारत’शी साधला संवाद

वैभव पवार /गणपतीपुळे

मालगुंड गावच्या सुनबाई व नायरीच्या (संगमेश्वर) सुकन्या रश्मी पवार या क्रिकेट जगतात दबदबा निर्माण करणाऱया भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंना तंदुरूस्तीचे धडे देत आहेत. महिला संघाच्या स्पोर्ट थेरपिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या रश्मी पवार यांनी नुकतीच मालगुंड व गणपतीपुळे येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ‘तरुण भारत’शी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

रश्मी पवार या मुळच्या संगममेश्वर तालुक्यातील नायरी येथील. मात्र त्यांचे जन्मापासूनचे वास्तव्य मुंबईमध्येच आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी स्पोर्ट थेरपिस्टचा डिप्लोमा केला. दोन वर्षे क्लिनीकमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर ‘स्पोर्ट थेरपिस्ट’ म्हणूनच करिअर करण्याचे निश्चित केले. दोन नामांकित डॉक्टर्सच्या संदर्भातून काही वर्षांनी बीसीसीआयकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. आणि मार्च 2017 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपिस्ट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी रश्मी पवार यांनी अनुष्का शर्मा, नेहा धुपिया, मोठमोठे उद्योजक, कंपन्यांचे ओनर, त्याचबरोबर जेएसडब्ल्यू, टाटा बिर्ला, वाडिया ग्रुप, खटाव मिल आदींसमवेतही काम केले. या सर्वांकडून प्रोत्साहन व कौतुकाची थाप मिळाल्याने त्यांनी या व्यवसायात अधिकाधिक लक्ष दिले. याचेच फळ बीसीसीआयकडून मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

बीसीसीआयकडून निवड हा अविस्मरणीय क्षण

बीसीसीआयकडून महिला संघाची स्पोर्ट्स थेरपिस्ट म्हणून झालेली आपली निवड हा सर्वात अविस्मरणीय व आनंददायी क्षण होता. माझ्यासाठी तो एक टर्निंग पॉईंट ठरला. माहेरचे व सासरचे नाव मोठे करावे ही वडीलांची इच्छा पूर्ण केल्याने या निवडीचा अधिकच आनंद झाला. याचे सर्व श्रेय आईवडिल व पती विनोद पवार यांचे असल्याचे त्यांनी मोठय़ा अभिमानाने सांगितले. त्यांचे पती विनोद पवार हेही मुंबई येथे फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला. त्यांच्याच पाठिंब्यामुळे व प्रोत्साहनामुळे आपण भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपिस्ट पर्यंत जाऊन पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

संघाची ‘गायनाथ’

रश्मी पवार या वर्षभरापासून भारतीय महिला क्रिकेट संघात स्पोर्ट थेरपिस्ट म्हणून कार्यरत असून या पदापर्यंत पोहचणाऱया त्या कोकणातील व महाराष्ट्रातीलही पहिल्या थेरपिस्ट ठरल्या आहेत. मार्च 2017 मध्ये निवड झाल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आपल्या कामाविषयी कौतुक केले. त्यानंतर अन्य संघ सहकाऱयांकडूनही कामाची पावती मिळाली. आपले काम भावल्याने संघ सहकाऱयांकडून आपल्याला ‘गायनाथ’ म्हणून संबोधले जात असल्याचे त्या सांगतात

2017 मध्ये दक्षिणा आफ्रिका दौऱयावर आपण गेलो होता. यावेळी आपल्या संघाने पाच वनडे सामन्यांची मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंडमध्ये जून 2017 मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी संघासोबत कामाची संधी मिळाली. 2018 मध्ये पुन्हा दक्षिण आफ्रिका व मलेशिया दौऱयासाठी काम करण्याची संधी मिळाली. या कामगिरीमुळे भारतीय ‘अ’ संघाच्या थेरपिस्टकरिताही आपल्याला मे 2018 मध्ये संधी मिळाल्याने बेळगाव येथे भारतीय संघाचा बांगलादेश संघाबरोबरचा सामना अनुभवता आला. श्रीलंका येथे 7 सप्टेंबरपासून महिला संघाची 3 वनडे व पाच टी-ट्वेंटी अशी मालिका होणार आहे. तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये टी-ट्वेंटी वर्ल्डकप वेस्टइंडिज मध्ये होणार असून याकरिता आपण थेरपिस्ट म्हणून जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संघ हाच परिवार

संपूर्ण संघ हाच आपला परिवार आहे, या परिवारासमवेत काम करताना खूप आनंद व समाधान वाटते. घरच्यांपासून दूर जाताना निशिचतच दुःख होते. मात्र संघ सहकारी कुटुंबीयांचा विरह जाणवू देत नाहीत. तीच अवस्था दौऱया संपल्यातनंतर होते. सहकाऱयांना सोडून घरी परततानाही बैचेन होते.