|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन

माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे :

‘एक रुपयात झुणका भाकर’ या संकल्पनेचे जनक, पुण्याचे माजी महापौर वसंत विठोबा थोरात यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून थोरात आजारी होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. दुपारी 1.30 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरेश बापट, आमदार शरद रणपिसे, शशिकांत सुतार, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांच्यासह माजी खासदार, आमदार, गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी थोरात यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

मंडई म्हणजे वसंत थोरात असे समीकरण असलेल्या वसंत थोरात यांचा अखिल मंडई मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कामात महत्वाचा वाटा होता. युद्ध व आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत पाठविण्यात त्यांचा सहभाग असायचा. काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते. 1974 -75 मध्ये ते महापौर झाले. मंडईमध्ये येणाऱया शेतकरी व गरीबांना किमान दोन घास खाता यावेत, या हेतूने महाराष्ट्रात प्रथम 1974 मध्ये झुणका भाकर केंद्र सुरु केले. तेव्हा त्यांनी महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1977 ला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती.

पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई मंडळाचे सर्वेसर्वा असलेल्या थोरातांनी एकदा कसबा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूकही जिंकली होती. पुण्याच्या सार्वजनिक जीवनातही त्यांना स्थान होते. थोरात यांनी पुणे महापालिकेचे नगरसेवकपद तसंच, महापौरपदही भूषविले होते. त्यांच्या महापौरपदाच्या काळात महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. पुढे अनेक महापालिकांनी त्याचे अनुकरण केले. यानंतर 1991 मध्ये ते आमदार झाले.