|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा

मॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची सरप्राईज व्हिजीट

विना सुरक्षारक्षक तासभर चालत केली पाहणी

रिमांड होमच्या मुलांसोबत केला नाश्ता

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने शहराची पहाणी करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कोणत्याही सुरक्षा रक्षकाला बरोबर न घेता तसेच जिल्हाधिकारी असल्याची पुसटशीही कल्पना दिली नाही. रिमांड होममधील मुलांसोबत नाश्ता करत दिल्या जाणाऱया सेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या सरप्राईज व्हिझीटमुळे काही कार्यालयामध्ये चांगलीच धावपळ उडाली.

रत्नागिरीला निसर्गाकडून मिळालेल्या देणगीचा पर्यटन विकासासाठी जास्तीत जास्त वापर करण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आखणी करायला सुरुवात केली आहे. फळबाग लागवड योजना यशस्वी करण्यासाठी काजू लागवडीला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

रत्नागिरी शहराची जवळून माहिती घेण्यासाठी त्यांनी ‘मार्निंग वॉक’ चा चांगला उपयोग करून घेतला. गुरुवारी सकाळी शिर्के हायस्कूल, अ. के. देसाई विद्यालय, येथून पुढे जातानाच अध्यापक विद्यालय भेट देत तेथील इमारतींची दुरावस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. पुरेशी जागा असूनही त्याठिकाणी असणाऱया गैरसोयींची त्यांनी दखल घेतली. तेथील दोन पडीक बंगल्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे अध्यापक विद्यालयाच्या मागे कोटय़वधी खर्चाची इमारत रखडल्याबाबतही त्यानी नाराजी व्यक्त केली. याचे काम पूर्ण करून लवकरात लवकर उद्घाटन करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा रिमांड होमला भेट देत मुलांशी संवाद साधला. आस्थापनेची पूर्ण माहिती घेताना मुलांची झोपण्याची, राहण्याची व्यवस्था, तेथील किचन. स्वच्छतागृह यांची परिपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर या मुलांबरोब नाश्ताही केला.

अर्धवट स्थितीतील पत्रकार भवनला भेट

चव्हाण यांनी जिल्हा उद्योग केंद्राला भेट देतानाच नजीकच्या पत्रकारांसाठीच्या अर्धवट स्थितीतील इमारतीलाही भेट दिली. पत्रकारांसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिली. परंतु त्या ठिकाणी बांधलेली इमारत अपूर्ण असून ती कशाप्रकारे पूर्ण होईल आणि शहरासह जिह्यातील सर्व पत्रकारांना त्याचा कसा लाभ मिळेल या दृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतीगृहाला भेट दिली. तेथील मुलांना देण्यात येणाऱया सुखसोईंची परिपूर्ण माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. रत्नागिरी जिल्हा हिवताप कार्यालय तसेच विभागीय समाजकल्याण कार्यालयाच्या परिसरात पाहणी केली. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाजवळ थिबा राजाच्या ध्यान धारणा स्थळाला भेट देवून पहाणी केली. त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देता येतील तेथील स्वच्छता कशा प्रकारे ठेवली जाईल यादृष्टीनेही त्यांनी परिसराची पहाणी केली.

ही सर्व पहाणी केल्यानंतर त्यांनी आयकर विभागाच्या रस्त्याने पुढे येत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेल्या जेल इमारतीची बाहेरुन पहाणी केली. इमारतीची एका ठिकाणी पडझड झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. तेथून पुढे येताना जिल्हा क्रीडा संकुलाच्या बँडमिंटन कोर्टलाही भेट दिली तेथील व्यायामशाळेची झालेली दुरावस्था, व अस्वच्छतेची त्यांनी गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकार्यांनी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने घेतलेल्या या आढाव्याची चर्चा होवू लागली आहे.

Related posts: