|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली!

गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली! 

वादळी वारे व लाटांचा तडाखा

खलाशांना वाचवण्यात यश

सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान

वार्ताहर /गणपतीपुळे

वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ‘देवलक्ष्मी’ नौका बुडाल्याने मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास जोरदार वारा आणि प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे वरवडेतील या नौकेला जलसमधी मिळाली. या दुर्घटनेमध्ये नौका मालकाचे सुमारे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांकडून देण्यात आली.

याविषयी अधिक माहिती अशी की, वरवडे खरवीवाडा येथील रमेश सिताराम डोर्लेकर (55) यांच्या मालकीची ‘देवलक्ष्मी’ ही नौका वरवडे समुद्रातून सकाळी पहाटेच्या सुमारास मासेमारीसाठी बाहेर पडली होती. गणपतीपुळे येथील मंदिर परिसरातील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक उसळलेल्या जोरदार लाटांमुळे व प्रचंड वाऱयामुळे ही नौका पलटी झाली. गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडत असताना खलाशांनी तत्काळ समुद्रात उडय़ा घेतल्या.

या नौकेपासून काही अंतरावर मासेमारी करणाऱया नौकेला ही दुर्घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ आपली नौका त्या ठिकाणी नेली. समुद्रात उडया मारलेल्या या 5 खलाशांना आपल्या नौकेवर घेत त्यांनी त्यांचा जीव वाचवला. या नौकेवरील मच्छीमारीसाठीची जाळी व इतर साहित्य वाहून गेली व त्यानंतर काही काळाने ‘देवलक्ष्मी’ लाही जलसमाधी मिळाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या घटनेची खबर मिळताच वरवडे येथील सर्वच मच्छीमार व्यावसायिकांनी गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी धाव घेऊन बुडालेल्या नौकेच्या शोधासाठी सायंकाळी उशिरापर्यंत अथक प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही.

या बुडालेल्या नौकेवर मालक रमेश सिताराम डोर्लेकर यांच्यासमवेत उत्तम डोर्लेकर (25), सतीश डोर्लेकर (27), किरण डोर्लेकर (22) व स्वप्नील डोर्लेकर (28) असे पाचजण होते. या घटनेची मा†िहती गणपतीपुळे येथील पोलीस दूरक्षेत्राला मिळताच या दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. बनप व त्यांचे सहकारी सलगर यांनी समुद्रकिनारी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर संबंधित बंदर खात्याच्या अधिकाऱयांना त्यांनी याबाबत कळवल्याची माहिती दिली.