|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत मनसे आक्रमक

रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत मनसे आक्रमक 

10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱयांना खड्डय़ात बसविण्याचा इशारा

कल्याण / प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येणार असल्याचा दावा केला असला तरी आजही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना आजही नागरिकांना खड्डेमय रस्त्यावर मार्गक्रमण करावे लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही खड्डे भरण्याच्या कामाची गती वाढत नसल्याने मनसेने गुरुवारी पालिकेचे ड प्रभाग कार्यालय गाठत ठिय्या दिला. यावेळी प्रभाग अधिकाऱयांना जाब विचारत पुढील 10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा त्याच खड्डय़ात तुम्हाला बसवू असा इशारा दिला आहे.

शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डे तसेच असमतोल रस्ते यामुळे कल्याणात तब्बल 5 बळी घेतल्यानंतर खड्डय़ावरून पालिका प्रशासनाला नागरिक आणि राजकीय पक्षांनी धारेवर धरले होते. यानंतर रस्ते विकास महामंडळाबरोबरच पालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश ठेकेदारांना दिल्याचे सांगितले असले तरी या खड्डय़ात तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून हे खड्डे बुजविण्याचा पालिका प्रशासनाने केलेला प्रयत्नही पावसाने उधळून लावला. पावसाने उघडीप देताच खड्डे भरण्याचे काम गतीने सुरू करण्यात येईल, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील असे पालिकेचे आश्वासन जणू हवेत विरले आहे. या खड्डय़ात पुन्हा एकदा खडी आणि माती टाकून हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. शहरात वाढलेली वाहतूक व अधून मधून कोसळणारा पाऊस यामुळे पुन्हा खड्डे जैसे थे असून शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ाची संख्या कमी न होता त्यात अधिक भर पडली आहे. सर्वच मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्याची खड्डय़ांनी चाळण झाल्याने या खड्डय़ातून ये-जा करताना नागरिक त्रस्त झाले आहेत. हे खड्डे बुजविण्याबाबत मनसेच्यावतीने निवेदने देण्यात आली. मात्र, आश्वासनानंतरही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने आज संतापलेल्या मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट पालिकेचे ड प्रभाग कार्यालय गाठत ठिय्या दिला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर ,महिला जिल्हा ध्यक्ष स्वाती कदम ,शहर अध्यक्ष शीतल विखनकर ,माजी नगरसेवक अनंता गायकवाड ,उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे ,संजय राठोड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट पालिकेचे ड प्रभाग कार्यलय गाठले .यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने प्रभाग अधिकार्यांना जाब विचारत इथून पुढे तुम्हाला निवेदने तक्रारी देणार नाही नागरिकाच्या सहनशीलतेच अंत पाहू नका येत्या 10 तारखे पर्यंत खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करा अन्यथा त्याच खड्डय़ात अधिकार्यांना बसवू असा इशारा दिला.