|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन

बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन 

विद्यापीठाचा बँक ऑफ महाराष्ट्रशी सामंजस्य करार

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय तळेरे, सिंधुदूर्ग आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे यांच्यात बी.कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) या अभ्यासक्रमासाठी गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये बँकिंग अँड इन्शुरन्स आणि अकाऊंटन्सी अँड फायनान्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले करण्यात आले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक महेश महाबळेश्वरकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदूर्ग जिह्यातील तळेरे येथे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाची स्थापना 2014 साली झाली असून या महाविद्यालयात बँकिंग क्षेत्राशी निगडीत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बँकिंग क्षेत्राचे नवे दालन खुले करण्यासाठी विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक  करार करण्यात आला.

या सामंजस्य कराराबद्दल बोलताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी समाजाभिमुख, रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षणाशी सांगड घालून तरुणांमध्ये रोजगारक्षमता निर्माण करणारे गुणवत्तापूर्वक शिक्षण ही खरी काळाची गरज असून तरुणांची महासत्ता म्हणून हा देश नक्कीच नावारुपाला येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर म्हणाले की, इंडस्ट्री – एकेडेमिया रिलेशनच्या दृष्टिने हा सामंजस्य करार एक सकारात्मक विचार म्हणून विद्यापीठ पुढे नेत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील अद्यायावत ज्ञानप्राप्तीचे हे एक माध्यम आणि त्यांच्यात आवड निर्माण करण्यासाठी एक उपयुक्त उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणेचे महाप्रबंधक महेश महाबळेश्वरकर यावेळी म्हणाले की, बँकेचे चांगले शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणे हे अभिमानास्पद आहे.

कराराची वैशिष्टय़े

एप्रेंटिस ट्रेनिंगची सोय उपलब्ध होणार

विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राकडे प्रोत्साहित करणे

संशोधनबद्दल मुलांमध्ये अभिरूची निर्माण करणे

बँकिंग आणि शिक्षणातील दरी दूर होणार

व्यावसायिक गुणवत्ता निर्माण करणे