|Thursday, June 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गौरी लंकेश हत्येसाठी दोन गटांकडून रेकी

गौरी लंकेश हत्येसाठी दोन गटांकडून रेकी 

प्रतिनिधी /बेंगळूर :

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी एकाच दिवशी दोन गटांकडून रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती एसआयटी तपासातून पुढे आली आहे. अमोल काळे याने गौरी लंकेश यांना संपविण्याची जबाबदारी परशुराम वाघमारे आणि गणेश मिस्कीन यांच्यावर सोपविली होती. याचवेळी त्याने दुसरीकडे सुधन्वा गोंधळेकर याच्या नेतृत्त्वाखालील आणखी एका गटावर ही जबाबदारी सोपविली होती.

5 सप्टेंबर 2017 रोजी बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर येथील गौरी लंकेश यांच्या निवासस्थानाबाहेर सुधन्वा गोंधळेकर दुचाकीवरून फिरत असल्याचे दृष्य येथील एका अपार्टमेंटवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाले होते. सदर फुटेज एसआयटीने न्यायालयात सादर केले असून सुधन्वाला आपल्या ताब्यात देण्याची विनंती महाराष्ट्र पोलिसांकडे केली आहे.

5 सप्टेंबर रोजी दुपारी 3.45 वाजता सुधन्वा गोंधळेकर गौरी यांच्या घरासमोर फिरत असल्याचे 15 सेकंदाचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱयात चित्रीत झाले होते. त्यानंतर अर्ध्या तासाने लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवरून चार-पाचवेळा ये-जा करणाऱया अज्ञाताने सुधन्वाला आपल्या दुचाकीवर बसवून तेथून काढता पाय घेतला. दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसला नाही. तो शरद कळसकर असावा, असा संशय एसआयटीला आहे.

दोन गट कशासाठी?

गौरी यांची 4 सप्टेंबर रोजीच  हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. पण त्यादिवशी सायंकाळी परशुराम वाघमारे आणि गणेश मिस्कीन घराजवळ पोहोचेपर्यंत गौरी लंकेश घरी पोहोचल्या होत्या. घरातील लाईट सुरू असल्याने ते दोघे आल्या मार्गे परत निघून गेले. त्यादिवशी आखलेली योजना फत्ते न झाल्याने अमोल काळे याने दुसऱया दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी सुधन्वा गोंधळेकर यांच्या नेतृत्त्वाखालील दुसरा गट हत्येसाठी तयार ठेवला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.