|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » विविधा » ट्रोलिंगद्वारे महिलांचा अवमान निंदनीय : अमृता फडणवीस

ट्रोलिंगद्वारे महिलांचा अवमान निंदनीय : अमृता फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठीच आपण समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतो आणि या माध्यमांवर ट्रोलिंगपासून कोणीही सुटत नाही. हे ट्रोलिंग आपण कसे घेतो ते महत्त्वाचे आहे. ट्रोलिंगद्वारे महिलांसाठी अवमानकारक आणि दहशत पसरवू पाहणाऱया कमेंट्स मात्र निश्चित निंदनीय असून, त्या थांबायला हव्यात. याबाबतीत गरज पडल्यास सायबर कायद्यांची मदत घ्यावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

खास महिलांसाठीच्या कपडे व दागिन्यांच्या ‘कुटॉर’ या प्रदर्शनाचे उद्घाटन कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सोशल मीडिया ते महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर आपली मते मांडली. या वेळी प्रदर्शनाच्या आयोजक स्मितादेवी पटवर्धन, नैना मुथा, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, उषा काकडे आदी उपस्थित होत्या.

महिलांच्या समस्या व महिला सक्षमीकरणाबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीस म्हणाल्या, लहान मुलींवरील अत्याचारांच्या बातम्या अत्यंत संतापजनक असून, यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. महिलांच्या संदर्भातील गुह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचा दर वाढला असून, ते सुचिन्ह आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधी महिलांनी महिलांच्या पाठीशी उभे राहणे फार महत्त्वाचे आहे. महिलांबाबतची सामाजिक मानसिकता बदलणे आवश्यक असून, शिक्षण व मूल्यांच्या रुजवणुकीतून ते शक्मय आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी टीका ते कशा प्रकारे घेतात, या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, होणारी टीका सकारात्मक असेल, तर त्याची दखल घेऊन सर्वसमावेशक चर्चेतून तोडगा काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असतो.

मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती म्हणजे डोक्मयावर पदर, अशी आतापर्यंतची प्रतिमा असताना तुम्हाला मात्र ‘फॅशन आयकॉन’ म्हणून पाहिले जाते. त्यावर तुमचे मत काय, या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, मी स्वतःला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतु, माझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी, असे मला वाटते. आपले व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी कपडे आणि फॅशन मदत करत असली, तरी आत्मविश्वास ही व्यक्तिमत्त्वातील सर्वात आवश्यक गोष्ट असते. माझे अनेक कपडे ‘एनआयएफटी’ संस्थेच्या फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले आहेत. त्यातून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते व त्याचा मला आनंद आहे.