|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात ‘आशा भोसले महोत्सव’

पुण्यात ‘आशा भोसले महोत्सव’ 

ऑनलाईन टीम / पुणे :

स्वयम’ संस्थेतर्फे 7, 8, 9 सप्टेंबर रोजी पुण्यात ‘आशा-दिल से’ नावाने आशा भोसले महोत्सवाचे आयोजन एस.एम. जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात करण्यात आले आहे. विख्यात गायिका आशा भोसले 7 सप्टेंबर रोजी वयाची 85 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ हा महोत्सव सादर करण्यात येणार आहे. यामध्ये पुण्यातील गायिका मृदुला निक्ते या आशाताईंनी गायिलेली 86 गीते सादर करणार आहेत.

महोत्सवाबाबत माहिती देताना निवृत्त कर्नल विवेक निक्ते यांनी सांगितले की, आशा भोसले यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही मंडळी हा कार्यक्रम सादर करणार आहोत. गायिका मृदुला निक्ते यांच्यासह विवेक पांडे, संयोगिता बदरायणी, उमेश पेडगावकर, रमेश कानडे, अभिजात भिडे, नरेंद्र डोळे, विवेक दाभाडकर आणि अनुपम बॅनर्जी हे कलाकार सहभागी होणार आहेत. तर शीतल कापशीकर, डॉ. बीना शहा आणि सतीश सेखरी हे निवेदन करणार आहेत.

कार्यक्रम रसिकांना विनामुल्य खुला असणार आहे. तर कार्यक्रमास मनोरंजनासोबत सामाजिक बांधिलकीचीही जोड देण्यात आली आहे. कार्यक्रमात दानपेटी ठेवण्यात येणार असून यामध्ये रसिकांकडून दान करण्यात आलेली रक्कम पुण्यातील डॉ. अभिजित सोनवणे यांच्या ट्रस्टला सुपूर्द करण्यात येणार आहे. डॉ. सोनावणे हे भिक्षेकरींवर मोफत औषधोपचार करतात, तसेच त्यांना भीक मांगण्यापासून परावृत्त करण्याचे कार्य करत आहेत.