|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सरपंच मानधन सुधारित शासन निकषाप्रमाणे द्या!

सरपंच मानधन सुधारित शासन निकषाप्रमाणे द्या! 

कणकवली पंचायत समिती बैठकीत ठराव : चतुर्थीत रेल्वे, बसस्थानकांवर आरोग्य पथके

वार्ताहर / कणकवली:

जिल्हय़ातील सरपंच मानधनाबाबत 2014 मध्ये सुधारित शासन आदेश देण्यात आले. मात्र, जिल्हय़ातील सरपंचांना अद्याप जुन्या शासन निर्णयाप्रमाणेच मानधन देण्यात येते. सरपंच पद गाव पातळीवर महत्वाचे असताना अशा कमी मानधनावर सरपंचांना काम करणे शक्य होत नाही. मानधनाबाबत निकषाप्रमाणे जिल्हय़ातील सरपंचांना मानधन देण्यात यावे, असा ठराव पं. स.च्या मासिक बैठकीत घेण्यात आला. तर गणेशोत्सव काळात 9 ते 12 सप्टेंबरपर्यंत आरोग्य पथके बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली.

पं. स.ची मासिक बैठक प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती दिलीप तळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले आदी उपस्थित होते.

खड्डय़ांवरून अधिकाऱयांवर प्रश्नांची सरबत्ती

तालुक्यातील रस्त्यांच्या खड्डय़ांच्या मुद्यावरून सा. बां. विभाग व जि. प. बांधकाम विभागाला धारेवर धरण्यात आले. मात्र, जि. प. बांधकाम विभागामार्फत खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून 11 रस्त्यांच्या कामांसाठी 2 लाखाचा निधी मंजूर झाल्याचे उपअभियंता रमाकांत सुतार यांनी सांगितले. मात्र, हा निधी अपुरा असल्याचे सदस्यांनी सांगितले. सा. बां.चे अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करीत अधिकारी आले नाहीत, तर त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारू, असे मिलिंद मेस्त्राr यांनी सांगितले. सा. बां.चे शाखा अभियंता पी. व्ही. कांबळी, पवार सभेला आल्यावर त्यांच्यावर खड्डय़ांबाबत सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पत्र देऊनही बैठकीला वेळेत हजर राहत नसाल, तर जनतेचे प्रश्न सुटणार कसे, असा सवाल करीत सभापतींनी नाराजी व्यक्त केली. कांबळे म्हणाले, काही रस्त्यांचे खड्डे जांभ्या दगडाने भरण्याचे काम सुरू आहे. 

कृषी सहाय्यकांनी ग्रामसभांना उपस्थित राहवे

कीटकनाशक फवारणी करणाऱया शेतकऱयांच्या आरोग्य तपासणीबाबत गणेश तांबे यांनी मुद्दा उपस्थित केला. याबाबत आदेश नसल्याचे डॉ. मिठारी यांनी सांगितले. कृषी सहाय्यक ग्रामसभांना जातात मात्र शेतकऱयांपर्यंत पोहोचत नाहीत, असा मुद्दा सुजाता हळदिवे, रावराणे व मेस्त्राr यांनी मांडला. त्यांना याबाबत सूचना देण्यात येतील, असे राठोड यांनी सांगितले.

फोंडाघाट बससाठी प्रस्ताव पाठविणार

सौ. हळदिवे यांच्या मुद्दय़ावर, फोंडाघाट-खैराटवाडी-बोकलभाटले या भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी फेरी सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन एसटीच्या अधिकाऱयांनी दिले. फोंडाघाट बसस्थानकातील शौचालयासाठी 17 लाख मंजूर असल्याचे सांगण्यात येतेय मात्र काम का होत नाही, असा सवाल मनोज रावराणे यांनी केला.

गणेशोत्सवात वीजपुरवठा सुरळीत ठेवा

राज्य मार्गालगत जनसुविधा पेंद्र व प्रसाधनगृह उभारणीबाबत काय कार्यवाही केली, असा सवाल गणेश तांबे यांनी केला. मात्र, शासकीय जागा नसल्याने अशी केंद्रे उभारली नाहीत, असे कांबळे यांनी सांगितले. याबाबत त्या मार्गालगतच्या ग्रा. पं.ना पत्रे द्या. त्यांच्याकडून जागा उपलब्ध होत असेल, तर अशी केंद्रे उभारा, अशी मागणी तांबे यांनी केली. गणेशोत्सव काळात वीजपुरवठा खंडित करू नका, अशी मागणी तळेकर यांनी केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, अजित वाडेकर, मेजर कौस्तुभ राणे, गुरुदास कामत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चर्चेत सुजाता हळदिवे, मिलिंद मेस्त्राr, सुभाष सावंत, प्रकाश पारकर, हर्षद वाळके, दिव्या पेडणेकर, सुचिता दळवी, मंगेश सावंत आदींनी सहभाग घेतला.

चतुर्थीनिमित्त दोनदा गावठी बाजार

जि. प. बांधकाम उपविभागाच्या आवारात दर शुक्रवारी भरविण्यात येणारा गावठी आठवडा बाजार शेतकऱयांच्या फायद्यासाठी गणेश चतुर्थीपूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजे सोमवार, 10 सप्टेंबर, मंगळवार, 11 सप्टेंबर व बुधवार, 12 सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. शेतकऱयांना फायदा व्हावा म्हणून हे दोन दिवस वाढविण्यात आले असून दर शुक्रवारी भरणारा बाजार त्या दिवशीही सुरू राहणार असल्याचे सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी सांगितले.