मालवणच्या पर्यटनाचा आज ‘श्री गणेशा’

व्यावसायिक सज्ज : शासनाकडून परवान्यासाठी कार्यवाही
प्रतिनिधी / मालवण:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाची पर्यटन राजधानी म्हणून मालवणकडे पाहिले जाते. ऐन पर्यटन हंगामात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली-देवबाग बीच व बॅकवॉटर, रॉक गार्डन पर्यटकांनी गजबजून जाते. 1 सप्टेंबरपासून पर्यटनाच्या नव्या मोसमाला प्रारंभ होत आहे.
गत हंगामात वाढत्या महागाईचा फटका पर्यटनाला बसला होता. तर अखेरच्या महिन्यात आलेल्या वादळी पावसामुळे पर्यटकांना जलपर्यटनाचा आस्वाद घेता आला नव्हता. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली होती. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी व तारकर्ली पर्यटन केंद्रात निवासासाठी येणाऱया पर्यटकांच्या आकडेवारीचा घेतलेला हा आढावा.
अन्य मार्गानेही होते वाहतूक
सप्टेंबर 2016 ते मे 2017 या पर्यटन हंगामात किल्ला वेलफेअर असोसिएशनमधील होडी व्यावसायिकांनी 3 लाख 44 हजार 567 पर्यटकांची किल्ल्यावर वाहतूक केली. त्याअगोदरच्या हंगामात सुमारे 3 लाख 93 हजार पर्यटकांची वाहतूक केल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. मात्र, यंदाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी दिसून आली. अन्य मार्गाने पर्यटकांना किल्ल्यावर नेले जात असल्याने ही घट दिसून येत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. यात सुसूत्रता आणली गेल्यास तसेच स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांना परवाने देऊन त्यांचे पर्यटन अधिकृत केले गेल्यास शासनाला बऱयापैकी कर मिळू शकतो. जलपर्यटन व साहसी पर्यटनावर करमणूक कर आकारण्याच्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत. सद्यस्थितीनुसार पर्यटन व्यवसाय जवळपास 50 कोटींचा बनला आहे.
तारकर्ली पर्यटन केंद्रावर पर्यटनास पसंती
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली पर्यटन केंद्रातील तंबू निवासांची आकडेवारी पाहिली, तर वर्षा पर्यटनासाठी पर्यटक तारकर्ली, देवबाग मालवणला पसंती देत असल्याचे दिसून येते. जून व जुलै महिन्यात पर्यटकांची संख्या बऱयापैकी दिसून आली. गतवर्षी मोठय़ा प्रमाणात पर्यटक तारकर्ली तंबू निवास व बांबू हाऊसमध्ये वास्तव्यास राहिले. पर्यटन विकास महामंडळाच्या हाऊस बोटमध्येही पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. यंदाच्या हंगामातही पर्यटकांच्या सेवेसाठी किल्ला होडी व्यावसायिक, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, देवबाग व तारकर्ली वॉटरस्पोर्टस्, बोटींग, पॅरासेलिंग सज्ज आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक
आर्थिक वर्षानुसार गेल्या काही वर्षातील
बंदर विभागाकडून प्राप्त आकडेवारी
(1 एप्रिल ते 31 मार्च)
2005-06 : 73 हजार 787
2006-07 : 1 लाख 18 हजार 39
2007-08 : 1 लाख 77 हजार 268
2008-09 : 2 लाख 12 हजार 403
2009-10 : 2 लाख 34 हजार 219
2010-11 : 2 लाख 51 हजार 842
2011-12 : 2 लाख 67 हजार 199
2012-13 : 2 लाख 69 हजार 631
2013-14 : 2 लाख 45 हजार 341
2014-15 : 3 लाख 25 हजार 331
2015-16 : 3 लाख 93 हजार 654
2016-17 : 3 लाख 44 हजार 567