|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आरक्षणासंदर्भात आता कारणे नको!

आरक्षणासंदर्भात आता कारणे नको! 

आगामी निवडणुकांत बसू शकतो फटका : नारायण राणे यांनी दिला इशारा

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

मराठा आरक्षणासंदर्भात आता कारणे सांगत बसू नये. निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा राज्य सरकारला त्याचा निश्चितपणे फटका बसणार आहे, असे स्पष्ट मत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी पडवे येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मालवण तालुक्यातील तोंडवली येथे होऊ घातलेला सी-वर्ल्ड प्रकल्प गुंडाळू देणार नाही. लवकर मुख्यमंत्र्यांना या संदर्भात बैठक घ्यायला लावणार, असेही त्यांनी सांगितले.

 पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पीटल येथे राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक सावंत उपस्थित होते.

 मराठा आरक्षणाबाबत बोलताना राणे म्हणाले, मराठा आरक्षण देण्याचा प्रश्न राज्य सरकार न्यायालयामध्ये जाऊन निकाली काढू शकते. हा प्रश्न आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी निकाली काढला पाहिजे. निवडणुका जाहीर झाल्यावर आचारसंहितेचे कारण पुढे केले जाईल. तर तसे चालणार नाही. निवडणुकीपूर्वीच हा प्रश्न मार्गी लावून मराठा आरक्षण दिले पाहिजे अन्यथा राज्य सरकारला निश्चितपणे त्याचा फटका बसेल, असा इशारा त्यांनी दिला.

तोंडवळी येथे होऊ घातलेला सी-वर्ल्ड प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो झालाच पाहिजे. सी-वर्ल्ड प्रकल्प गुंडाळू दिला जाणार नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच एक बैठक घ्यायला लावून सी-वर्ल्ड प्रकल्पाला चालना देण्यास लावू, असेही राणे म्हणाले.

 मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेबाबत नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, चौपदरीकरणाचे काम योग्य प्रकारे सुरू असल्याचे दिसत नाही. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे किंवा कंत्राट रद्द केले पाहिजे. गणपतीपूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवून महामार्ग सुव्यवस्थित केला पाहिजे. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. 12 सप्टेंबरला चिपी विमानतळावर विमान उतरविण्याची टेस्ट घेतली जाणार आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू येणार असून त्यांच्यासोबत आपण असणार आहे, असेही ते म्हणाले.

 सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने संघर्ष यात्रा सुरू केली आहे. संघर्ष यात्रा काढण्याची गरजच नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे मागच्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेतून गेलेले आहे. त्यांनी काहीच काम केले नव्हते. त्यामुळे संघर्षयात्रा काढून काय उपयोग आहे? काँग्रेसकडे नेतेही राहिले नाहीत, असे राणे म्हणाले.