|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंतरराष्ट्रीय विमान डिसेंबरमध्ये

आंतरराष्ट्रीय विमान डिसेंबरमध्ये 

दीपक केसरकर यांची माहिती : 12 सप्टेंबरला पहिले विमान

वार्ताहर / सावंतवाडी:

परुळे चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हय़ात पहिले आंतरराष्ट्रीय विमान येत्या 12 डिसेंबरला उतरणार आहे. मात्र, त्याआधी 12 सप्टेंबरला पहिले विमान लँडिंग होईल. त्यासाठीची परवानगी घेण्यात आली आहे. काहीजण मुद्दामहून खोडा घालत आहेत. आम्ही काम करून दाखविणार. कुठल्याही परिस्थितीत येत्या जानेवारी 2019 पासून आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यास सुरुवात होतील, असे गृह तथा वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले.

चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरेल, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी टीका केली होती. तो मुद्दा पकडून केसरकर म्हणाले, चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. विमान लँडिंगबाबतची परवानगी संबंधित विभागाकडून घेण्यात आली आहे. केंद्रीय हवाई उड्डानमंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत यांनी 12 सप्टेंबरला उद्घाटनाचे पहिले विमान
प्रायोगिक तत्त्वावर उतरेल, असे सांगितले आहे. त्यानुसार आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, कुणी मुद्दामहून खोडा घालत असतील तर जिल्हय़ातील जनताच त्यांना प्रत्यक्षात विमान उतरल्यावर उत्तर देईल. बोलणारे बोलत राहतील. आम्ही काम करत राहणार आहोत.

दोन महिन्यात कमर्शियल विमाने येतील

चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर पहिले विमान उतरणार आहे. त्यानंतर येत्या एक-दोन महिन्यात कमर्शियल विमानांचे लँडिंग होईल. पहिले आंतरराष्ट्रीय विमान 12 डिसेंबरला उतरेल. त्यानंतर जानेवारी 2019 पासून आंतरराष्ट्रीय विमाने उतरणार आहेत. देशी-विदेशी पर्यटक जिल्हय़ात विमानाने येणार आहेत.

भरघोस निधी आणला

या जिल्हय़ाची कृषी, पर्यटन, पशूसंवर्धन, मत्स्य अशी चौफेर विकासगंगा आता पाहायला मिळणार आहे. यापूर्वी कुणी या भागाच्या विकासासाठी एवढा निधी आपल्या कारकिर्दीत आणला नाही. यापुढेही ते आणू शकणार नाहीत. त्याहून कितीतरी पटीने मी निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या 2019 पूर्वी जिल्हय़ाचा विकास जनतेला पाहायला मिळेल. जे विरोधक फक्त बोलत आहेत. टीका करत आहेत ती त्यांना करू दे, असेही केसरकर म्हणाले.

हिटलिस्टवरील 27 जणांना संरक्षण

नालासोपारा स्फोटके प्रकरणात सापडलेल्या संशयिताच्या नोंदवहीत 27 साहित्यिक, लेखक, वकील आदींची नावे हिटलिस्टवर सापडली आहेत. गृहविभाग या सर्वांना संरक्षण देणार आहे. जर त्यांना संरक्षण नको असेल तर गृहविभाग लक्ष ठेवून राहणार आहे. सावंतवाडीतील एका ज्येष्ठ साहित्यिकाचे नाव हिटलिस्टमध्ये आहे. त्यांना संरक्षण देण्यात येईल, असेही केसरकर म्हणाले.

Related posts: