|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आजगावला पावणेसहा लाखाचे चरस जप्त

आजगावला पावणेसहा लाखाचे चरस जप्त 

133 हातबॉम्ब, बंदुकीसह जिवंत काडतुसेही जप्त : गोवा नार्कोटिक्स विभागाची कारवाई

  • संशयित पेडी फर्नांडिस पसार
  • नार्कोटिक्स, पोलिसांतर्फे स्वतंत्र गुन्हे

 

जप्त केलेला मुद्देमाल                                                                     किंमत

चरस                               1.974 किलो                                     5, 74, 900 रुपये

बंदूक                               01                                                  10 हजार रुपये

जिवंत काडतुसे                  06                                                  1 हजार 800 रुपये

गावठी हातबॉम्ब               133                                                 13 हजार 300 रुपये

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

गोवा नार्कोटिक्स विभागाचे अधीक्षक जीतेंद्र रंजन व त्यांच्या पथकाने वेंगुर्ले पोलिसांसोबत शुक्रवारी पहाटे अडीच वाजता तालुक्यातील शिरोडानजीक आजगाव-भोमवाडी येथील पेडी डॉमनिक फर्नांडिस याच्या राहत्या घरावर छापा टाकला. या छाप्यात 1 किलो 974 ग्रॅम वजनाचे व सुमारे पावणे सहा लाख रु. किमतीचे चरस, सिंगल बॅरल काडतुसची बंदूक, जिवंत सहा काडतुसे व 133 गावठी हातबॉम्ब जप्त करण्यात आले. या प्रकरणी नार्कोटिक्स विभाग व पोलिसांतर्फे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यातील संशयित पसार झाला आहे.

आजगाव-भोमवाडी येथील घर क्रमांक 486 मध्ये प्रेडी डॉमनिक फर्नांडिस हा घरात अमली पदार्थ बाळगत असल्याची गोपनीय माहिती गोवा नार्कोटिक्स विभागाचे अधीक्षक जीतेंद्र रंजन यांना मिळाली होती. त्यानुसार रंजन यांनी तहसील कार्यालयातील कर्मचारी मच्छींद्र मुळीक, संतोष मोरे, पोलीस ठाण्यातील कोळेकर, घाडीगावकर, महिला पोलीस पालयेकर यांच्यासह पेडी याच्या घरावर छापा टाकला.

संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न

अधिकाऱयांनी छापा टाकला, त्यावेळी पेडी घरात नव्हता. घरात ऑलिंडा ऍलेक्स फर्नांडिस व तिचा भाऊ डॅरेल असे दोघेच आढळून आले. त्यांच्याकडे पेडीची चौकशी केली असता, तो मासेमारीसाठी गेल्याचे तसेच त्याची पत्नी व मुलगा देखील घरी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पथकाने काहीकाळ त्याची वाट पाहिली. त्यानंतर तो ज्या ठिकाणी मासेमारीसाठी जातो, त्याठिकाणी जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न सापडल्याने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. मात्र, त्याचा मोबाईल घरातच असल्याचे आढळून आले.

घरातून मोठा साठा जप्त

प्रेडीचा शोध लागत नसल्याचे लक्षात येताच अधीक्षक रंजन यांनी पोलिसांसमक्ष घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरात 1 किलो 974 ग्रॅम वजनाचे व सुमारे 5 लाख 74 हजार 900 रुपयांचे चरस, एक सिंगल स्मृथ बॅरल लाकडी दस्ता असलेली 10 हजार रुपये किंमतीची काडतुसाची बंदूक, प्लास्टिकच्या डब्यात 1 हजार 800 रुपये किमतीची सहा जिवंत काडतुसे व सफेद रंगाच्या कापडी पिशवीत 13 हजार 300 रुपये किमतीचे गावठी हातबॉम्ब आढळून आले. पेडी फर्नांडिस अथवा त्याच्या घरातील अन्य कोणाच्याही नावे बंदूक परवाना नाही. त्यामुळे सदर बंदूक, काडतूस व गावठी हातबॉम्ब जप्त करण्यात आले. या प्रकरणी पेडी याच्या विरोधात भादंवि कलम 286, बारी पदार्थ अधिनियम 1908 कलम 5, शस्त्र अधिनियम 1959 कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थ कायद्यांतर्गही गुन्हा

पेडी याच्या घरातून 1 किलो 974 ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत 5 लाख 74 हजार 900 रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती मिळाली नाही. या प्रकरणी चरस बाळगल्याप्रकरणी प्रेडी याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Related posts: