|Friday, August 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जून तिमाहीत ‘जीडीपी’ची गगनभरारी

जून तिमाहीत ‘जीडीपी’ची गगनभरारी 

विकास दर 8.2 टक्क्यांवर : उत्पादन, कृषी क्षेत्राची दमदार कामगिरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जून 2016 नंतर प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेने उत्तम कामगिरी केली आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल-जून 2018-19 दरम्यान विकास दर 8.2 टक्क्यांवर पोहोचला. औद्योगिक आणि कृषी क्षेत्राने जीडीपीमध्ये वाढ होण्यास मदत झाली असून गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक विकास दर गाठण्यास यश आले.

मार्च तिमाहीत जीडीपी विकास दर 7.7 टक्क्यांवर पोहोचला होता. जून 2017 तिमाहीच्या समान कालावधीत तो 5.6 टक्के होता. अनेक अर्थतज्ञांच्या मते गेल्या तिमाहीचा विकास दर 7.6 टक्क्यांवर पोहोचेल असे सांगण्यात येत होते. उत्पादन, वीज, वायू, पाणी पुरवठा, अन्य युटिलिटी सेवा, बांधकाम, संरक्षण आणि अन्य सेवांमध्ये 7 टक्क्यांपेक्षा अधिक विकास दर पोहोचला आहे. उत्पादन क्षेत्राकडून सर्वाधिक उत्तम कामगिरी करण्यात आली असून या क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी समान कालावधीत यात 1.8 टक्क्यांनी घसरण नोंदविण्यात आली होती.

सेवा क्षेत्रात सुस्ती

उत्पादन क्षेत्राने भरीव कामगिरी केली असली तरी सेवा क्षेत्रात अपेक्षित कामगिरी दिसून आलेली नाही. गेल्या वर्षी या क्षेत्राचा विकास दर 9.5 टक्के होता, तो घसरत 7.3 टक्क्यांवर आला. केंद्र सरकारने जीडीपीच्या मूल्यमापनासाठी आधारभूत वर्षामध्ये बदल केला आहे. यापूर्वी 2004-05 वर्षावरून आता 2011-12 वर्षाला आधारभूत वर्ष 2015 पासून समजण्यात येते.

2011-12 च्या स्थिर किमतीच्या आधारानुसार 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत देशाची अंदाजे जीडीपी 33.74 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत ती 31.18 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे विकास दरात 8.2 टक्के वाढ नोंदविण्यात आली. बुधवारी रिझर्व्ह बँकेकडून वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून चालू वर्षाचा विकास दर 7.4 टक्के राहील असे म्हणण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय स्थान मजबूत

जीडीपीमध्ये वाढ झाल्याने उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे स्थान सुधारण्यास मदत होईल. जून तिमाहीत चीनचा विकास दर 6.7 टक्के होता. जीडीपीत वाढ झाल्याच्या वृत्तामुळे आता विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या रुपया कमजोर होत असतानाही अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केल्याचे मानण्यात येते.

चालू वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 10 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी रुपयाने एका डॉलरसाठी 71 चा तळ गाठला होता.