|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » होसूरजवळ वाघाचे दर्शन

होसूरजवळ वाघाचे दर्शन 

वार्ताहर/ कोवाड

कोवाड बेळगाव रस्त्यावरील होसूर गावाजवळ गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास रस्त्यावरच वाघाचे दर्शन झाले. या परिसरात गेल्या दहा बारा दिवसापासून अनेकांना वाघ दिसत असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भाग भितीने गारठला आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर होसूर (ता. चंदगड) येथून कोवाड-बेळगाव रस्त्यावरुन वाघ बेळगावच्या दिशेने चालत जात होता. चारचाकी वाहनातून एक कुटुंब बेळगावच्या दिशेने जात असताना दूरवरुन वाघ चालत जाताना पाहताच या कुटुंबाची भितीने गाळण उडाली. कोवाड -बेळगाव या रस्त्यावर पहाटेपासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. वाघाच्या या आगमनाने आता हा परिसर भीतीने गारठला आहे.

कोवाड (ता. चंदगड) येथील ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक एस. टी. कदम हे आपल्या कुटुंबासमवेत कोवाडला येत असताना त्यांना बेकीनकेरे परिसरात हा वाघ दहा दिवसांपूर्वी दिसला होता. मात्र अनेकांनी या घटनेकडे कानाडोळा केला होता. वाघ आज पुन्हा दिसल्याने या परिसरात आता वाघ ठाण मांडून असल्याचे सिद्ध झाले आहे. महीपालगड, वैजनाथ मंदिर हा परिसर घनदाट वृक्षांनी वाढलेला आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी तालुक्मयात याच परिसरात पहिल्यांदा हत्तीचे आगमन झाले होते. होसूर येथील महिला लीला पाटील या महिलेला हत्तीने सोंडेने आपटून ठार मारले होते. हत्तीपाठोपाठ आता या परिसरात वाघाने ठाण मांडल्याने शेतकरी वर्गासह  कर्नाटक, महाराष्ट्र सीमाभाग भीतीच्या छायेत आहे.