|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तेलंगणमध्ये मुदतपूर्व निवडणूक?

तेलंगणमध्ये मुदतपूर्व निवडणूक? 

विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय शक्य : के. चंद्रशेखर राव यांनी बोलाविली मंत्रिमंडळ बैठक

  वृत्तसंस्था/ हैदराबाद

तेलंगणमध्ये मुदतपूर्व निवडणूक व्हावी याकरता तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव रविवारी विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय  जाहीर करू शकतात. मुख्यमंत्री राव यांनी रविवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलाविली असून यामध्ये या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे समजते.

 तेलंगणमध्ये पहिल्या विधानसभेसाठी मे 2014 मध्ये निवडणूक पार पडली होती. चंद्रशेखर राव यांचा कार्यकाळ मे 2019 मध्ये पूर्ण होतोय. केसीआर यांची भाजपसोबत वाढती जवळीक पाहता काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात आघाडी उघडली असली तरीही पक्षाचा प्रभाव तुलनेने कमीच आहे. परंतु सद्यस्थितीत केसीआर यांचेच पारडे जड असल्याचे मानले जाते.

लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक होऊ नये, यासाठी राव प्रयत्नशील असल्याचा कयास वर्तविला जातोय. यंदाच्या वर्षाअखेरीस होणाऱया 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत तेलंगणमध्ये देखील निवडणूक घेतली जावी, यासाठी ते आग्रही असल्याची चर्चा आहे. रविवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक महत्त्वपूर्ण घोषणा होणार असून यामुळे पूर्ण राज्याचे वातावरणच बदलणार असल्याचे विधान माहिती-तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामाराव यांनी केले आहे.

केसीआर विरोधकांना घाबरले : काँग्रेस

विधानसभा विसर्जित करण्याच्या वृत्तांवर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्ष एकत्र येत असल्यानेच तेलंगण राष्ट्रीय समितीला पुढील निवडणुकीत पराभवाची भीती सतावू लागली आहे. या भीतीपोटीच केसीआर हे राज्यात मुदतपूर्व निवडणूक करवू इच्छित असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला.

टीआरएसची भूमिका

राज्यात सबळ विरोधकच नाहीत, येथे अन्य पक्ष विरोधी पक्षाचा दर्जा प्राप्त करण्याच्या स्थितीत देखील नाहीत. आम्ही राज्य सरकारच्या कामांबद्दल निश्चिंत आहोत. आम्ही आमच्या सरकारचे प्रगतीपुस्तक लवकरच जनतेसमोर मांडणार आहोत, असे केसीआर यांच्या कन्या के. कविता यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांचे संकेत

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देखील अलिकडेच तेलंगण विधानसभेची निवडणूक चालू वर्षाच्या अखेरीस होतील, असे पक्षनेत्यांना उद्देशून सांगितले होते. तसेच त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुदतपूर्व निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना केली होती. भाजप तसेच टीआरएस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता नाही.