|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » बॉक्सर अमितचा ‘गोल्डन पंच’

बॉक्सर अमितचा ‘गोल्डन पंच’ 

अंतिम फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबोयवर मात, ब्रिज प्रकारातही भारताला सुवर्ण,

वृत्तसंस्था/ जकार्ता

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारताच्या अमित पांघलने 49 किलो गटात उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबोयचा पराभव करत बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. याशिवाय, प्रणब वर्धन व शिबनाथ सरकार यांनी ब्रीज प्रकारात पुरुष दुहेरी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्क्वॅशमध्ये मात्र भारतीय महिला संघाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत भारताला हाँगकाँगकडून पराभव स्वीकारावा लागला. पुरुष हॉकीत कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने पांरपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-1 असे नमवले. अखेरच्या दिवशी पदकतालिकेत भारताच्या खात्यावर 15 सुवर्ण, 24 रौप्य व 30 कांस्यपदकासह एकूण 69 पदके जमा आहेत.

शनिवारी 49 किलो गटात भारताच्या अमित पांघलसमोर ऑलिम्पिक व आशियाई चॅम्पियन उझबेकिस्तानच्या हसनबोय दुस्मातोव्हचे आव्हान होते. विशेष म्हणजे, जागतिक क्रमवारी व अनुभव पाहता हसनबोय हा अमितपेक्षा कित्येकपटीने सरस होता, मात्र अमितने अंतिम लढतीत या ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला चांगलाच दणका दिला. पहिल्या फेरीत हसनबोय अमितवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता मात्र अमितने सुरक्षित अंतर राखत बचाव केला. यामुळे हसनबोयला गुण मिळवता आले नाहीत. दुसऱया फेरीत मात्र अमितच्या आक्रमक खेळासमोर हसनबोय दडपणाखाली पहायला मिळाला. याचा फायदा घेत अमितने सामन्यावर चांगलीच पकड निर्माण केली. तिसऱया फेरीतही अमितने बचाव व आक्रमणाचा सुरेख मेळ साधत या सामन्यात 3-2 अशी बाजी मारताना भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबोयविरुद्ध अंतिम लढतीत मी चांगला खेळ केल्यानेच जेतेपदापर्यंत पोहोचता आले, अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर अमितने दिली.

विशेष म्हणजे, हरियाणाच्या 22 वर्षीय अमितचे आशियाई स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले. याआधी, त्याने ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते तर याच वर्षी ताश्कंद येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली होती. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल आठ वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. यापूर्वी, 2010 आशियाई स्पर्धेत विकास क्रिशन व विजेंदर सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमध्ये केवळ दोनच पदकावर समाधान मानावे लागले.