|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बेलेवाडी घाटात टॅव्हल्स व टॅक्सची समोरासमोर धडक

बेलेवाडी घाटात टॅव्हल्स व टॅक्सची समोरासमोर धडक 

वार्ताहर/ उत्तूर

उत्तूर-गारगोटी मार्गावर बेलेवाडी घाटातील वळणावर ट्रव्हल्स व टॅक्सची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघतात दहाजण जखमी झाले. यातील चौघेजण गंभीर असून जखमींवर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय तसेच गंभीर जखमींवर  गडहिंग्लज येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले सर्वच प्रवाशी भुदरगड तालुक्यातील आहेत. पोलीसात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी, सालपेवाडी (ता. भुदरगड) येथील ही खाजगी टॅव्हल्स गडहिंग्लज येथील भाडे घेऊन आळंदी येथे गेली होती. आळंदीवरून शनिवारी सकाळी ही टॅव्हल्स आली, गडहिंग्लज येथील प्रवाशांना सोडून पुन्हा टॅव्हल्स गारगोटीच्या दिशेने जात होती. बेलेवाडी घाटातील एका वळणावर टॅव्हल्स चालक युसुफ लाला बिरंजे (वय 50, रा. कोल्हापूर) याचा गाडवरील ताबा सुटल्याने गारगोटीकडून उत्तूरच्या दिशेने येणाऱया टॅक्सवर टॅव्हल्स आदळल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले ओह.

अपघतामध्ये टॅक्स चालक संदीप ईश्वर घोडके (वय 35, रा. पिंपळगांव, ता. भुदरगड), सुधा विलास देसाई (वय 32), मालूताई जयसिंग देसाई (वय 66) दोघी रा. गारगोटी, शोभा आबिटकर (वय 40, रा. शेळोली, ता. भुदरगड) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर गडहिंग्लज येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय नयना नारायण बेळवेकर (वय 36, रा. गारगोटी), ईश्वर कृष्णा रेडेकर (वय 64, रा. भांडीबाबर), धोंडीराम दादू तोरस्कर (वय 65, रा. हेळेवाडी), चिचू नागू येडगे (वय 65, बेडीवपैकी धनगरवाडा), सर्जेराव बाळकू घाटगे (वय 60, रा. दिंडेवाडी, ता. भुदरगड) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. टॅव्हल्स चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे जखमींनी सांगितले.

         पळून जाणाऱया चालकाला तरूणांनी केले पोलीसांच्या स्वाधीन

घाटात अपघात झाल्यानंतर जखमींना दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी ट्रव्हल्सचा चालक युसुफ बिरंजे घाटातून गारगोटीच्या दिशेने पळत जात होता. अपघाताची बातमी समजताच अपघात पाहण्यासाठी अपघातस्थळी येणाऱया पिंपळगांव येथील तरूणांच्या ही गोष्ट लक्षात आली. या तरूणांनी चालकाला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.

         रूग्णालयात जखमींच्या नातेवाईकांची गर्दी

अपघातात जखमी झालेले सर्वच प्रवाशी भुदरगड तालुक्यातील आहेत. या जखमींना गडहिंग्लज येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी गडहिंग्लज येथील रूग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती.