|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ग्रामपंचायतींचे प्रश्न मांडण्यासाठी सरपंचांमधून आमदार निवडणे आवश्यक

ग्रामपंचायतींचे प्रश्न मांडण्यासाठी सरपंचांमधून आमदार निवडणे आवश्यक 

प्रतिनिधी / आजरा

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांचा काळ लोटला तरीही ग्रामपंचायती सक्षम झाल्या नाहीत. देशात तसेच राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी लोकशाहीतील सर्व प्रयोग प्रथम ग्रामपंचायत व सरपंचांवर केले जातात. याचे फायदे-तोटे या घटकांना सोसावे लागतात. ग्रामपंचायतींचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी राज्याच्या कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा विभागातून सरपंचांमधून सहा आमदार निवडण्याची गरज असल्याचे मत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आजरा तालुका सरपंच संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक आजरा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संभाजी सरदेसाई यांनी केले. यावेळी पाटील म्हणाले, पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी पदवीधर मतदार संघातून आमदार निवडला जातो. शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षकांमधून आमदार निवडला जातो. मग ग्रामपंचायत व सरपंचांवर अन्याय का असा प्रश्न त्यांनी केला. ग्रामपंचायत चालविणे हे सोप काम निश्चित नाही. शहरे स्मार्ट होताना शासनकर्त्यांचे गावांकडे मात्र दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. सरपंचांनी महत्वाची भूमिका घेतली तरच शासनाची कोणतीही योजना यशस्वी होते. पण शासनाने या घटकाकडेच दुर्लक्ष केले आहे. चक्राकार आरक्षण, शिक्षण पात्रतेची अट, अपत्यांची अट फक्त ग्रामपंचायतीलाच का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

खासदार, आमदारांना मानधन दिले जाते. सरपंचांना पदरमोड करून काम करावे लागते. सरपंचांची पदरमोड थांबली तर गावांचा गतीमान विकास होईल. याकरीता ग्रामसेवकांना जितका पगार दिला जातो तितके मानधन सरपंचांना मिळाले पाहिजे. ग्रामपंचायती व सरपंचांचे प्रश्न नोव्हेंबरमध्ये होणाऱया सरपंच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सरपंच म्हणून केवळ ग्रामपंचायत चालविणे हा उद्देश असता कामा नये, गावातील प्रत्येक कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी सरपंचांनी विविध योजना राबविणे गरजेचे असून ती सरपंचांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी हणमंत माळी, बापू झुंजारे, तानाजी गोरे, मडिलगेचे सरपंच दिपक देसाई, भादवणचे सरपंच संजय पाटील, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष मारूती मोरे, सरपंच संघटनेचे सदस्य पांडूरंग तोरगले, राजू पोतनीस, सौ. सविता पाटील, कविता आजगेकर, सौ. वृषाली कोंडूसकर, सौ. वृषाली धडाम, सौ. नंदा पोतनीस, सौ. रूपाली आर्दाळकर, वसंत देसाई, आजरा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र सावंत यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संभाजी इंजल यांनी सूत्रसंचलन केले तर सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र मुरूकटे यांनी आभार मानले.

कृपया सदर बातमी जिल्हा पानावर प्रसिद्ध होणे आवश्यक.