|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पर्यटनस्थळ म्हणून किटवडे विकसित करा : डॉ. संपत खिलारी

पर्यटनस्थळ म्हणून किटवडे विकसित करा : डॉ. संपत खिलारी 

प्रतिनिधी/ आजरा

आजरा तालुक्याला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभले असून किटवडे हे गाव पर्यावरणाच्यादृष्टीने सक्षम आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक होणाऱया पावसाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहून टिकवडे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा असे आवाहन आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले. महाराजस्व अभियानांतर्गत टिकवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या चावडी वाचन कार्यक्रमात ते बोलत होते.

निसर्गसंपन्न असा हा परीसर आहे. याठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाऊस होता. यावर्षीच्या पावसाने शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कर्मचाऱयांना देण्यात आले आहेत. येथील ग्रामस्थांनी अतिपावसाचा पर्यटनाच्यादृष्टीकोनातून विचार करून हा परीसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येईल का यासाठी प्रयत्न करावेत. निश्चितपणे येथील जीवमान उंचाविण्यासाठी याचा लाभ होईल असा विश्वासही डॉ. खिलारी यांनी व्यक्त केला.

यानंतर ग्रामस्थांच्या ऑनलाईन 7/12 पत्रकांचे वाचन करण्यात आले. 42 वारसा नोंदी, एकत्र कुटुंब प्रमुख चार नोंदी तर अज्ञान पालकत्वाच्या 7 अशा एकूण 54 नोंदी नेंदविण्यात आल्या. किटवडे पैकी धनगरवाडय़ावरील धनगर बांधवांना प्रांताधिकाऱयांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी मांडल्या समस्यांबाबत डॉ. खिलारी यांनी सविस्तर चर्चा केली. वनहक्क दाव्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल अशीही ग्वाही देण्यात आली. किटवडे व घाटकरवाडी बंधाऱयाला गळती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर संबंधित अधिकाऱयांशी चर्चा करून ही गळती काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी हमी प्रांताधिकाऱयांनी दिली.

धनगरवाडय़ाकडे जाणारा ओढा पार करून जाताना पावसाळय़ात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणच्या साकवासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी बी. वाय. कोळी, तलाठी समीर जाधव, सरपंच रणजित पाटील, पोलीस पाटील विष्णू पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

Related posts: