|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एटीएम फोडणारी टोळी महाराष्ट्रातील?

एटीएम फोडणारी टोळी महाराष्ट्रातील? 

बेळगावनंतर बागलकोटमध्ये फोडले एटीएम

प्रतिनिधी/ बेळगाव

पाईपलाईन रोड, गणेशपूर येथील एटीएम मशिनफोडून 2 लाख 15 हजार रुपये पळविल्याची घटना ताजी असतानाच दुसऱया दिवशी अशीच घटना बागलकोटमध्येही घडली आहे. या गुह्यांमागे महाराष्ट्रातील असल्याचा संशय बळावला असून या टोळीचा शोध घेण्यात येत आहे.

पाईप लाईन रोड, गणेशपूर येथील इंडिया वन एटीएम फोडण्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला होता. प्रत्यक्षात गुरुवारी मध्यरात्रीनंतर 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. कारमधून आलेल्या भामटय़ांनी गॅस कटरने एटीएम फोडून 2 लाख 15 हजार रुपये पळविले होते. या प्रकरणी कॅम्पचे पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडे पुढील तपास करीत आहेत.

आजवर एटीएम फोडण्याचे अनेक प्रकार घडूनही गुन्हेगारांना यामध्ये यश आले नव्हते. अत्यंत हुषारीने गॅस कटरचा वापर करुन एटीएम मशिन फोडणारी ही टोळी महाराष्ट्रातील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम शनिवारी दिवसभर सुरु होते.

इंडिया वन एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा दोन महिन्यांपासून बंद होता. उपलब्ध माहितीनुसार एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर गुन्हेगारांनी शटर ओढुन घेतल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवरील पोलीस या परिसरात आले होते. शटर बंद असल्यामुळे त्यांना एटीएममध्ये काय चालले आहे? याचा अंदाज आला नाही.

दरम्यान गणेशपूर येथे एटीएम फोडणाऱया टोळीने शुक्रवारी मध्यरात्री बागलकोट येथील एक एटीएम फोडून 5 लाख रुपये पळविल्याची घटना शनिवारीसकाळी उघडकीस आली आहे. बागलकोट पोलीस बेळगाव पोलिसांच्या संपर्कात असून या दोन्ही घटनांमागे एकच टोळी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बागलकोट येथे तरी सीसीटीव्हीचे फुटेज मिळतात का? याची प्रतिक्षा पोलीस अधिकारी करीत आहेत.