|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » पाकला दणका :अमेरिकेने 2100 कोटींची मदत रेखली

पाकला दणका :अमेरिकेने 2100 कोटींची मदत रेखली 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

पाकिस्तानला तगडा दणका देताना अमेरिकेने 300 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली आहे. दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. एकप्रकारे जोपर्यंत दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत तुमची आर्थिक नाकेबंदी केली जाईल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी डागाळली आहे.दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास पाकिस्तान अयशस्वी ठरलंय, वारंवार सूचना करुन देखील दहशतवादाविरोधात कारवाई न केल्यामुळे आम्ही 300 मिलियन डॉलर्सची आर्थिक मदत रोखण्याचा निर्णय घेतल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. या पैशाचा वापर इतर कामांसाठी केला जाईल असं, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल कोनी फॉकनर यांनी सांगितलं. यावषीच्या सुरूवातीलाही अमेरिकेने पाकिस्तानची 50 कोटी डॉलरची आर्थिक मदत रोखली होती.

 

एक दिवसापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही असे म्हटले होते. पाकिस्तानला अमेरिकेशी सन्मानपूर्वक संबंध ठेवायचे आहेत. तसेच भारत, अफगाणिस्तान आणि इराणबरोबरही शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. मात्र अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रद्द केले जातील, असा इशाराही खान यांनी पंतप्रधान निवासावर आयोजित पत्रकार परिषदेत दिला होता.