|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळली, चार जणांना अटक

दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळली, चार जणांना अटक 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका 24 वषीय दुकानदाराची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच येथे आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही या कारणास्तव दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे ,अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द येथील पृथ्वीराज अपार्टमेंटमध्ये प्रफुल थोरात राहण्यास आहे. दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे,दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे या चौघांनी प्रफुल यास दहीहंडीसाठी 500 रुपये वर्गणी मागितली. या वर्गणीवरून त्यांच्यामध्ये वाद झाला. प्रफुलने वर्गणी न दिल्याचा राग मनात धरून पहाटेच्या सुमारास दत्ता शिंदे आणि त्याच्या अन्य मित्रांनी पृथ्वीराज अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये प्रफुल थोरात याच्या गाडीवर पेट्रोल टाकून जाळून टाकली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीसांनी दिली.