|Thursday, June 27, 2019
You are here: Home » मनोरंजन » यशस्वी चित्रपटांचा यशस्वी लेखक हृषिकेश कोळी

यशस्वी चित्रपटांचा यशस्वी लेखक हृषिकेश कोळी 

सध्या मराठीत मनोरंजन क्षेत्रात एकामागून एक नवे चित्रपट येत असताना, त्यात एक नाव आवर्जून विशेष उल्लेखाने घेतले जात आहे आणि ते म्हणजे लेखक हृषिकेश कोळीचे. लेखकाचे नाव पोस्टरवर किंवा प्रसिद्धीत दुर्लक्षिले जाते त्याकाळात हृषिकेशच्या नावाला मिळालेले वलय कौतुकास्पद आहे.

  अलीकडचा हमखास यशस्वी लेखक ही त्याची ओळख, ती निर्माण होण्याला कारण म्हणजे त्याला प्रेक्षकांची अचूक नस कळते, नेमके प्रेक्षकांना काय सांगायचे, त्यांचे मनोरंजन करत कुठल्या शब्दात ते त्यांच्यापर्यंत पोहचवायचे हे व्यावसायिक तंत्र त्याला गवसले आहे. त्यापाठी चित्रपटाचा विषय आणि तो पाहणारा प्रेक्षक याच्या व्यावसायिकतेसाठी लागणारा दांडगा अभ्यास ही हृषिकेश कोळीची जमेची बाजू. त्यामुळे बॉईजसारख्या सुपरहिट चित्रपटानंतर एकाचवेळी समित कक्कड यांचा ‘सोशिओपॉलिटीकल बच्चन’ असो आणि अमेय खोपकर निर्मित ‘येरे येरे पैसा 2’ सारखा विनोदी चित्रपट असो. हृषिकेश कोळीने गंभीर ते विनोदी अशा वेगवेगळय़ा शैलीत स्वत:चं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. यंदा 5 ऑक्टोबरपासून बॉईज 2ने सुरुवात करत, तफप्ती भोईर यांचा ‘माझा अगडबम’ आणि नंतर वर्षाच्या सुरुवातीला 4 जानेवारीला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा 2’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

हृषिकेशला मिळालेल्या या यशामागे त्याच्या एकांकिका ते नाटक या प्रवासाचा मोठा वाटा आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका विश्वामध्ये त्याने लिहिलेल्या पुरस्कारप्राप्ततेपासून हौसफुल्ल, जुम्मेबाज, अर्बन, दस्तुरखुद्द, ओश्तोरीज, तपीश, मोजलेम, कोंडी, अलगद, मुस्काट आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नव्याने जागफत करून डोळे पाणावणारी गिरगांव व्हाया दादर अशा एकाहून एक सरस विषयांच्या आणि वैविध्यपूर्ण रचनेच्या एकांकिका सातत्याने यशस्वी ठरल्या. प्रेक्षकांची नस ओळखण्याचे कौशल्य त्याला या वेगळय़ा प्रयोगांमधून मिळाले.

 एकांकिकेच्या वलयातून साहजिकच व्यावसायिक नाटकाकडेही तो वळला आणि मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा या नावाजलेल्या संस्थेकडून पहिलं नाटक एक तिकिट सिनेमाचं रंगभूमीवर आलं. तसेच अस्तित्व या संस्थेच्या त्या दरम्यान या लेखकांच्या उपक्रमासाठी जयवंत दळवी यांच्या पुरुष नाटकावर आधारित लिहिल्या गेलेल्या ‘वर खाली दोन पाय’ या नाटकाने मराठी रंगभूमीला लेखन आणि दिग्दर्शनाला एका वेगळय़ा वळणावर नेऊन ठेवले. एकांकिका आणि नाटकात मुशाफीरी सुरू असतानाच चित्रपटांचे कथा-पटकथा-संवाद लेखन सुरू झाले व पॅरी ऑन मराठा ते बॉईज असा चढत्या आलेखाचा क्रम इथेही कायम राखला गेला आणि आजच्या घडीचा सगळय़ात यशस्वी आणि लिखाणात त्याच ताकदीने सातत्य राखणारा लेखक म्हणून नावारुपाला आला.