|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज 

टीव्हीवर कशाची ब्रेकिंग न्यूज होऊ शकते याला काही नियम नाही. अर्थात टीव्हीला का दोष द्यावा? कोणे एके काळी म्हणजे टीव्हीचे आगमन होण्यापूर्वी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्यासारखी जगभर खळबळ माजवणारी घटना घडली होती आणि एका मोठय़ा वर्तमानपत्रात त्या दिवशी पहिल्या पानावरची हेडलाईन गर्जून सांगत होती की मुंबईच्या रेड लाईट भागात दोन टोळय़ांमध्ये चाकू-सुरे वापरून मारामारी झाली. तेव्हा कोणत्या बातमीला पहिल्या पानावर मुख्य जागी स्थान द्यायचे किंवा ब्रेकिंग न्यूज म्हणायचे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्या संपादकांचा. युपीएचे सरकार असताना अण्णा हजारे उपोषणाला बसले त्या दिवशीची गंमत-आदल्या दिवशी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात झालेल्या भांडणाचे तपशील एक टीव्ही वाहिनी दिवसभर रंगवून रंगवून सांगत होती. करीना कपूरच्या बाळाच्या बाळलीला पाहून कंटाळा आला तरी मी हल्ली चिडत नाही. महत्त्वाच्या बातम्या काय दुसऱया दिवशी दैनिकात येणारच असतात.

स्वातंत्र्यपूर्व काळात चित्रपटविषयक किंवा नाटकविषयक बातम्या छापणे कमीपणाचे मानले जाई. न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर संपादक असताना ‘संत तुकाराम’ चित्रपटावर स्फुट आले होते आणि आचार्य अत्र्यांच्या ‘घराबाहेर’ या नाटकावर टीका करणारा लेख वर्तमानपत्रात छापून आला होता म्हणून सर्वत्र खळबळ माजली होती. आता एखाद्या वृत्तवाहिनीवर चुकून भारदस्त व गंभीर बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकली तर देशात सनसनाटी माजेल असे
वाटते.

तस्मात सांगणे इतकेच की आपली थोर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने स्वतःपेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाशी लग्न करायचे ठरवले किंवा दीपिका आणि रणवीरचे लग्न ठरले या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत. वृत्तवाहिन्या ती बातमी आपल्याला सतत दाखवीत आहेत आणि त्यावर चर्चा करीत आहेत त्या अर्थी आज राष्ट्रासमोरचा तो महत्त्वाचा विषय
असावा.

 पेट्रोल-डिझेलचे वाढत चाललेले भाव, रुपयाची घसरण, पुढच्या वषी येऊ घातलेल्या निवडणुका, लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव, दहशतवाद्यांचा प्रश्न, दाभोलकर आणि इतर विचारवंतांच्या हत्यांचा तपास वगैरे फिजूल प्रश्नांवर विचार करू नये. किंबहुना ते प्रश्न आपण विसरून जावेत. यातच आपल्या चिमुकल्या मेंदूचे हित आहे.