|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जनमुनी

जनमुनी 

स्वातंत्र्यानंतर ज्यांचा जन्म झाला आणि ज्यांनी आपल्या साधनेने, आचरणाने आणि वाणीने, अनेकांना प्रभावित केले असे अध्यात्म व तत्त्वज्ञान क्षेत्रातले जे मोजके संत आहेत त्यापैकी तरुणसागर महाराज यांचे नाव घ्यावे लागेल. आपल्या कडव्या प्रवचनातून समाजाला दिशा देणाऱया या जनमुनींचे शनिवारी दिल्लीत महानिर्वाण झाले आणि एक राष्ट्रसंत मोठे विचार मागे ठेऊन काळाआड गेला. त्यांच्या या महानिर्वाणाने समाजाचा एक सच्चा मार्गदर्शक हरपला आहे. तरुण सागर हे संत, मुनी परंपरेतील होते. ‘मै जैन मुनी नही जन मुनी हूँ’ असे ते म्हणत असत आणि बोले तैसा चाले हा त्यांचा स्थायीभाव होता. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कृतीतून देशप्रेम, माणुसकी, अहिंसा, कर्मनिष्ठा यांचा प्रत्यय येत असे आणि आपले विचार, कडव्या शब्दात परखडपणे मांडण्याची त्यांची हातोटी प्रत्ययकारी बनली होती. केवळ जैनबांधवच नव्हे तर सर्वधर्मिय मंडळी त्यांच्या कटू प्रवचनाचे चाहते हेते. म्हणूनच जिथे जिथे त्यांनी चार्तुमास केला, प्रवचने दिली, लोकांना दिशा दाखवली त्या सर्व गावातील हजारो माणसे महाराजांच्या महानिर्वाणानंतर दु:खी, कष्टी झाली आहेत. माणसे मोठी होतात, पदाला पोहोचतात,अनेकांच्या हृदयात स्थान मिळवतात ते उगीच नाही. त्यामागे त्यांचा त्याग असतो, तपश्चर्या असते, सेवा असते. तरुण सागर महाराजांनी आपल्या अवघ्या एकाव्वन वर्षाच्या आयुष्यात ही किमया साधली होती. सद्विचार आणि सद्आचार केवळ देवळात आणि भाषणात, प्रवचनापुरते असता कामा नयेत ते लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि आचरणात आणले पाहिजेत हा ध्यास घेऊन हे मुनी आयुष्यभर कार्यरत होते. या जैनमुनींचे जेथे प्रवचन असेल तिथे रक्तदान शिबिर घ्या असा आग्रह असे. छत्रपती शिवराय, शाहू महाराज आणि अनेक संत यांची ते प्रवचनातून उदाहरणे देत. त्यांनी जैनधर्मियांना मार्गदर्शन केलेच पण मध्य प्रदेश, हरियाणा आदी विधानसभांच्या सदस्यांनाही कटू वचने ऐकवली म्हणून पंतप्रधानांपासून लहान गावातील छोटय़ा भक्तांपर्यंत अनेकांना त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे.  खरे तर संत, महंत, ऋषी यांचे मूळ व कुळ शोधू नये. त्यांचे कार्य आणि विचार लक्षात घ्यावेत पण अशी व्यक्ती कोणत्या भागातून, संस्कारातून घडली हे महत्त्वाचे असते. तरुण सागर यांचा जन्म मध्य प्रदेश मधील गुहजी गावचा. त्यांचे मूळ नाव पवनकुमार जैन. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. आपले गुरु आचार्य पुष्पदंत सागर यांच्याकडून सन 88 मध्ये त्यांनी दिगंबर मुनी म्हणून जैन धर्माची दीक्षा घेतली. भगवान महावीरांचे सत्य, अहिंसा  विचार मांडायला सुरुवात केली. काळाची गती-प्रगती, साधने त्यांनी अवगत केली. वृत्तपत्रे, दूरदर्शन, ग्रंथलेखन, सभा, पारायणे यामध्ये त्यांचा सहभाग असे आणि आपल्या परखड वाणीने ते प्रभावी मार्गदर्शन करत असत. दिल्लीचा लाल किल्ला असो, हरियाना, विधानभवन असो अथवा छोटय़ा गावातील बस्ती जनसामान्यांना प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न अखंड सुरु असे. हिंसाचार, भ्रष्टाचार, दुराचार यावर ते प्रवचनातून कटू शब्दात प्रहार करत असत. पण, हा जनमुनी अत्यंत प्रेमळ आणि लोकहितकारी होता. शांतिदूत होता. तरुण सागर महाराज धर्म आणि राजकारण यावर अधिकारवाणीने बोलत. राजकारण्यांना व अधिकाऱयांना भेटत. शिक्षण, सिद्धांत आणि जनकल्याण हा ध्यास घेऊन त्यांनी जैन तत्त्वज्ञान जनसामान्यांना लोकभाषेत सांगितले. अनेकांना व्यसनमुक्त केले. अनेकांना हिंसेपासून रोखले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही तरुण सागर महाराजांना विजया दशमीच्या सोहळय़ात वक्ते म्हणून बोलवले होते आणि या कडव्या संघटनेने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या गणवेशात बदल करुन चामडी पट्टा वगळला होता. तरुण सागर महाराज आपल्या कृतीतून, उक्तीतून अहिंसेचा विचार कसा उंचावत यांचे हे छोटे उदाहरण म्हटले तरी त्यांचा अनेक गोष्टीसाठी, सुधारणांसाठी आग्रह असे. ‘स्त्राr’ भ्रूणहत्या संदर्भाने ते कटू बोलत. बदल हा स्वत:त केला पाहिजे. सुधारणांचा प्रारंभ स्वत:पासून करा. ज्या घरात स्त्रियांना सन्मान नाही, ज्या घरात मुलगी नाही त्यांना त्यांची जाणीव करुन द्या. प्रसंगी त्या घरात जाऊ नका, सोयरीक करु नका असे ते सांगत. गरीब, दरिद्री लोक बघून ते कष्टी होत. आद्य शंकराचार्यांनी बालपणी वयाच्या आठव्या वर्षी माधुकरी मागताना लोकांचे दैन्य व दारिद्रय़ बघून गावातील देवळात साक्षात लक्ष्मीशी भांडण केले. वाद घातला हा वाद कनकस्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जनमुनी त्यांच वृत्ती-प्रवृत्तीचे होते. समाजातील दारिद्रय़, दु:ख विसंगतीमुळे व्यथित होणारे हे मुनी प्रागतिक होते. काळानुरुप बदलले पाहिजे. जुने जपले पाहिजे. पण नवे चांगले स्वीकारले पाहिजे. असा त्यांचा आग्रह असे. गेली काही वर्षे त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. पण, त्यांनी पायी प्रवास  व जैनमुनांचे सर्व आचार निष्ठापूर्वक पाळले होते. पायी प्रवास होईना तेव्हा त्यांनी डोली वापरली पण लोकांना भेटणे, त्यांना मार्गदर्शन करणे थांबवले नाही. काविळ आजाराचा त्रास झाला म्हणून दिल्लीत मॅक्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झाले. पण उपचारा दरम्यानही त्यांनी आपले व्रत कायम ठेवले होते. तब्येत साथ देत नाही हे लक्षात येताच त्यांनी कृष्णानगर राधापुरी मंदिरात चातुर्मासस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. जैन साधूंच्या परंपरेप्रमाणे संथारा किंवा स्वीकृतीनंतर संलेखना घेण्याचा निर्णय केला आणि अन्न-पाणी त्यागून त्यांनी प्राण सोडले. छोटय़ा आयुष्यात या व्यक्तिमत्वाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले. पिढय़ा न् पिढय़ा लोक त्यांचे व त्यांच्या कटू प्रवचनांचे, क्रांतिकारी विचारांचे स्मरण करतील, त्यांचे विचार आणि आचार महत्त्वाचे हे भान बाळगले पाहिजे. या महान मुनीस विनम्र अभिवादन !