|Thursday, February 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सुवर्ण जिंकले अन् लष्करी सेवा टळली!

सुवर्ण जिंकले अन् लष्करी सेवा टळली! 

टॉटेनहम हॉटस्परचा फॉरवर्ड खेळाडू सन हेयूंग-मिन याने चक्क मिलिटरी सेवा टाळण्यासाठी सुवर्ण जिंकून दाखवले. विद्यमान जेत्या दक्षिण कोरियाने जपानला 2-1 अशा फरकाने मात दिली. त्यात सन याचा कर्णधार या नात्याने मोलाचा वाटा राहिला. कोरियन संघातर्फे ली सेयूंग-वू व चॅन यांनी प्रत्येकी एक गोल केला. दक्षिण कोरियात प्रत्येक पुरुष व्यक्तीला 28 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 21 महिने सेवा करणे सक्तीचे आहे. पण, त्यांचे सरकार आशियाई सुवर्ण व ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक जिंकणाऱया खेळाडूंना यापासून सवलत देते. त्याचमुळे सन देखील अशी सवलत मिळाली आहे.

‘माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम दिवस ठरला’, असे सन याने सुवर्ण स्वीकारल्यानंतर नमूद केले. ‘मला माझ्या संघसहकाऱयांविषयी अतिशय अभिमान आहे. आम्ही सर्वांनी 120 मिनिटे अगदी संघर्षपूर्ण खेळ साकारला. जेव्हा आमचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित रहात पाठबळ दर्शवतात, त्यावेळी आणखी सरस खेळ साकारण्याची जिद्द निर्माण होते आणि हाच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कालावधी आहे’, असे तो पुढे म्हणाला.

या अंतिम लढतीत कोरियाने बरेच वर्चस्व गाजवले. पण, त्याचवेळी गोल नोंदवण्याच्या काही उत्तम संधीही गमावल्या. इथे सुवर्ण जिंकता आले नसते तर सन यांना 21 महिने सक्तीची राष्ट्रीय सेवा करावी लागली असती. टॉटनहम हॉटस्परने या स्पर्धेसाठी केवळ सनलाच मुक्त केले आणि त्याचमुळे तो येथे खेळू शकला.

सनला यापूर्वी 2014 इंचेऑन आशियाई स्पर्धेसाठी कोरियन संघात निवडले गेले होते. पण, त्यावेळी बेयर लेव्हरकुसेन या त्याच्या तत्कालीन क्लब संघाने त्याला मुक्त केले नव्हते. आश्चर्य म्हणजे कोरियाने त्यात सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये तो दक्षिण कोरियातर्फे खेळला. पण, त्याच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत होंडुरासकडून पराभव स्वीकारावा लागला.

Related posts: