|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » ज्युडोमध्ये जपानच अव्वल

ज्युडोमध्ये जपानच अव्वल 

जपानने यंदाच्या आशियाई स्पर्धेत देखील उत्तम वर्चस्व गाजवले. ज्युडोच्या स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचत असताना त्यांनी एकाच दिवशी 3 सुवर्णपदके जिंकत आपली मोहीम यशस्वी केली. दिवसभरातील 5 पैकी 3 सुवर्णपदकावर त्यांनी आपली मोहोर उमटवली.

रुईको सातोने दिवसभरातील पहिले सुवर्ण जिंकताना महिलांच्या 78 किलोग्रॅम वजनगटात पहिले अव्वल यश प्राप्त करुन दिले. तिने दक्षिण कोरियाच्या पार्क यू-जिनला लेग स्वीप इपॉनवर मात दिली. ‘कोणत्याही परिस्थितीत मला जिंकायचेच आहे, हे मी स्वतःला सातत्याने बजावून सांगत होते आणि शेवटी वझा तंत्रावर मी यश खेचून आणलेच’, अशी प्रतिक्रिया तिने आपल्या इव्हेंटनंतर दिली.

‘एकदा संधी मिळाल्यानंतर मी जिंकू शकले नसते तर पुन्हा मला संधी मिळाली नसती. त्यामुळे देखील येथे यश खेचून आणण्यासाठी मी दक्ष होते’, असे तिने नमूद केले. त्यानंतर केन्टारो लिदाने जपानची सुवर्ण मालिका कायम राखली. त्याने पुरुषांच्या 100 किलोग्रॅम वजनाखालील गटात दक्षिण कोरियाच्या चो गू-हॅमला मात दिली. ‘मला आणखी बऱयाच आव्हानांना सामोरे जावे लागेल. पण, येथे विजय संपादन करता आल्याने माझे मनोबल चांगलेच उंचावले आहे’, असे 20 वर्षीय लिदा म्हणाला. तो या आशियाई स्पर्धेतील सर्वात तरुण सुवर्णजेताही ठरला.

‘येथे मी हरलो असतो तर माझ्यात आणि माझ्या प्रतिस्पर्ध्यांत बरेच अंतर आहे, अशी माझ्यावर टीका झाली असती. कदाचित ऑलिम्पिकसाठी माझा विचारही झाला नसता. पण, येथे सुवर्ण जिंकून मी निश्चितच आशाअपेक्षा उंचावल्या आहेत’, असे त्याने नमूद केले. याशिवाय, विद्यमान विश्वविजेती अकिरा सोने हिने जपानला दिवसभरातील तिसरे सुवर्ण जिंकून दिले. तिने महिलांच्या 78 किलोखालील वजनगटात दक्षिण कोरियाच्या किम मिन-जेओंगला मात दिली.

अन्य इव्हेंट्समध्ये पुरुषांच्या 90 किलोग्रॅम वजनगटात दक्षिण कोरियाच्या ग्वाक डाँग-हानने मंगोलियाच्या गॅन्तुल्गाला पराभूत केले. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणारा कोरियाचा हान अंतिम फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीत त्याने विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन माशू बेकरला देखील पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. नंतर बाकरने कांस्यपदकाच्या लढतीत उझ्बेकच्या सॅबिरोव्हला पराभूत केले. त्याच्यासाठी हे पहिलेच आशियाई पदक ठरले.