|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » जपान शेवटच्या सुवर्णपदकाचा मानकरी

जपान शेवटच्या सुवर्णपदकाचा मानकरी 

मिश्र ट्रायथलॉन या यंदाच्या आशियाई स्पर्धेतील शेवटच्या इव्हेंटमध्ये जपानच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. युका सातो, जम्पेई फुरुया, युको ताकाहाशी व युईची होसोदा यांचा या संघात समावेश राहिला. जपानने 1 तास 30 मिनिटे व 39 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. दक्षिण कोरियाने रौप्य तर हाँगकाँग व चीन यांनी कांस्यपदकाची कमाई केली.

ट्रायथलॉन इव्हेंटमध्ये 300 मीटर्स जलतरण, 6.7 किलोमीटर्सचे सायकलिंग व 2.1 किलोमीटर्स धावण्याचा समावेश असतो. एकूण 13 संघांनी या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. युको ताकाहाशीने यापूर्वी शुक्रवारी महिलांच्या ट्रायथलॉन इव्हेंटमध्ये 1 तास 52 मिनिटे 59 सेकंद वेळेत जपानला आणखी एक सुवर्ण जिंकून दिले होते.

चीनच्या झोंग मेंगयिंगने रौप्य तर मकाऊच्या होई लाँगने कांस्यपदक मिळवले. दरम्यान, पुरुषांच्या ट्रायथलॉनमध्ये जपानच्या जम्पेई फुरुयाने 1 तास 49 मिनिटे व 43 सेकंद अशा वेळेसह सुवर्ण जिंकले. कझाकस्तानच्या अयान बेईसेनबायेव्हने रौप्य तर चीनच्या लि मिंगक्झूने कांस्य मिळवले. मिश्र ट्रायथलॉन हा एकच इव्हेंट रविवारी या स्पर्धेच्या सांगतेप्रसंगी आयोजित केला गेला. आशियाई स्पर्धेत देखील शेवटच्या दिवशी केवळ एकच इव्हेंट घेतला जाण्याची परंपरा आहे. ती यंदाही कायम राहिली. 

आशियाई स्पर्धेतील पुरुष हॉकीचे सुवर्ण जपानने जिंकले. त्यांनी पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत मलेशियाला 3-1 अशा फरकाने नमवले. तत्पूर्वी, निर्धारित वेळेत दोन्ही संघात 6-6 अशी बरोबरी झाली. निर्धारित वेळेत 8 मिनिटांचा खेळ बाकी होता, त्यावेळी 5-2 अशी भरभक्कम आघाडी असतानाही प्रथम बरोबरी व नंतर शूटआऊटमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने मलेशियाचा संघ कमनशिबी ठरला.