|Friday, November 16, 2018
You are here: Home » क्रिडा » मुष्टियुद्धात यिन-चँगला सुवर्णपदके

मुष्टियुद्धात यिन-चँगला सुवर्णपदके 

यिन जिन्हुआ व चँग युआन यांनी मुष्टियुद्धातील शेवटच्या दिवशी चीनला 10 पैकी दोन सुवर्णपदके कमावून दिली. यिनने महिलांच्या 57 किलोग्रॅम वजनगटात अव्वल यश प्राप्त केले. तिने अंतिम फेरीत उत्तर कोरियाच्या जो सन ह्वा हिला 4-1 अशा एकतर्फी फरकाने पराभूत केले.

‘या यशाने मी अतिशय उत्साहित आणि आनंदित झाले आहे. माझ्या परिश्रमाला येथे सुवर्णपदकाची पोचपावती मिळाली. सुवर्णपदक केवळ माझ्यासाठी नाही तर पूर्ण संघासाठी आहे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया यिनने व्यक्त केली. ती यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यविजेती ठरली होती. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण सुवर्णपदक जिंकू, असा विश्वास तिने येथे नोंदवला.

‘2020 मध्ये पोडियमवर पोहोचणे, हे माझे यापुढील लक्ष्य आहे. रिओमधील अपयश माझ्यासाठी आताही बोचणारे ठरले आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी बाकी असताना रिओत जे कमावता आले नाही, ते टोकियोत कमावण्यासाठी मला सर्वस्व पणाला लावावे लागेल’, असे ती आत्मविश्वासाने म्हणाली.

अन्य लढतीत युवा ऑलिम्पिक व चायनीज राष्ट्रीय विक्रमधारक चँग युआन हिने महिलांच्या 51 किलोग्रॅम वजनगटात संथ प्रारंभानंतरही उत्तर कोरियाच्या पँग चोल मीविरुद्ध 3-2 अशा फरकाने विजय प्राप्त केला. चँगने यापूर्वी मे महिन्यात निमंत्रितांच्या स्पर्धेत देखील पँगला पराभवाचा दे धक्का दिला होता.

‘वास्तविक, ज्या प्रतिस्पर्ध्याला आपण पूर्वी केव्हा तरी हरवलेले असते, त्यांच्याविरुद्ध पुन्हा लढणे अधिक धोकादायक असते. कारण, त्यांनी एकदा पराभवाचा अनुभव घेतलेला असतो आणि त्या लढतीतून त्यांनी काही धडे घेतलेले असू शकतात’, असे चँग यावेळी म्हणाली. येथे सुवर्ण जिंकले असले तरी अद्याप मला माझ्या खेळात बरीच सुधारणा करायची आहे, याचाही तिने उल्लेख केला.

चीनने मुष्टियुद्धात याशिवाय, शान जू, वू झाँगलिन व क्झू यांच्या यशामुळे आणखी तीन कांस्यपदके जिंकली. उझ्बेकिस्तानने सर्वाधिक 5 सुवर्ण व 2 रौप्यपदके जिंकली. उर्वरित 3 सुवर्णपदके अनुक्रमे मंगोलिया, भारत व दक्षिण कोरिया यांनी प्रत्येकी 1 जिंकली.

Related posts: